नाशिक : 10 हजार रुपयांची लाच घेताना वजन मापे निरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
अशोक श्रीपती गायकवाड (वय 52) वजन मापे निरीक्षक वर्ग-2, वजन मापे कार्यालय, श्रीरामपूर, जि. अहमदनगर रा-जिजामाता चौक, स्टेट बँकेजवळ श्रीरामपूर, जि. अहमदनगर असे लाच घेणाऱ्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे राधाकृष्ण विखे पाटील सहकारी ट्रक वाहतूक संस्था, प्रवरानगरचे मॅनेजर असून या संस्थेच्या वतीने भारत पेट्रोलियम कंपनीचा पेट्रोल पम्प चालविला जात आहे. या पेट्रोल पंपाची वार्षिक तपासणी करून स्टॅम्पिंग प्रमाणपत्र देण्यासाठी गायकवाडने तक्रारदाराकडे 12,000 रुपयांची लाच मागितली. याबाबत त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली.
या तक्रारीच्या अनुषंगाने आज प्रवरानगर येथील संस्थेच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या पेट्रोल पंप येथे गायकवाड यांनी तक्रारदार यांचे कडे 12,000 रुपयांची लाच मागणी करुन तडजोडीअंती 10,000 रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना गायकवाड यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
लोणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे- वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी व पोलीस उप अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक प्रवीण लोखंडे, पोलीस अंमलदार रवी निमसे, सचिन सुदृक, किशोर लाड, चालक हरून शेख यांनी केली.