नाशिक (चंद्रशेखर गोसावी) : शहरात आज सकाळी आयकर विभागाने काही सरकारी ठेकेदार व चार्टर्ड अकाऊंटंट यांच्या कार्यालयांसह निवासस्थानी छापे टाकले आहेत. ही कारवाई एक-दोन दिवस अजून चालण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, की नाशिक शहरात आयकर विभागाने सर्वसाधारण दीड महिन्याच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा छापेमारी केली आहे. मुंबईतील सुमारे 150 अधिकारी वेगवेगळ्या 70 वाहनांतून नाशिकमध्ये आज सकाळी दाखल झाले. हे अधिकारी नाशिकमध्ये दाखल झाल्यानंतरही औरंगाबाद व दुसरीकडे छापेमारी झाल्याची प्रथम माहिती देण्यात आली होती; परंतु प्रत्यक्षात छापेमारी ही नाशिक शहरात झाली आहे. याबाबत पोलिसांनाही कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. नंतर पोलिसांना या कारवाईमध्ये सहभागी करून घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
आयकर विभागाने आज सकाळी केलेल्या या छापेमारीमध्ये सरकारी ठेकेदार असून, त्यांच्याशी निगडित काही चार्टर्ड अकाऊंटंट यांच्या कार्यालय व निवासस्थान यांच्यावरही छापेमारी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग, महानगरपालिका व जिल्हा परिषदेशी निगडित असलेल्या काही ठेकेदारांवर आयकर विभागाने छापेमारीची कारवाई केली आहे. यातील दोन ठेकेदार हे नाशिकमध्ये वास्तव्यास असले, तरी ते सिन्नर तालुक्याशी निगडित आहेत, तर एक ठेकेदार हा मुंबई नाका येथे वास्तव्यास असून, त्याने महाराष्ट्र पोलीस अकादमीसह काही सरकारी इमारतींच्या बांधकामात सहभाग घेतलेला आहे, तर याच ठेकेदाराचा व्यावसायिक पार्टनर हा जिल्हा परिषदेचा माजी सदस्य असून, त्याने सभापती म्हणून कामकाज पाहिलेले आहे.