संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेतून विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.
यावेळी पंतप्रधान मोदींनी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. तसेच, आपल्या भाषणादरम्यान विकसित भारताचा पाया मजबूत करण्यासाठी मोदी 3.0 ची घोषणा करत आगामी पाच वर्षाचा रोडमॅप सांगितला.
यावेळी पीएम मोदी म्हणाले, आमच्या सरकारचा 3.0 सुरू होणार आहे, या काळात विकासाचा वेग आम्ही कमी होऊ देणार नाही. आमची तिसरी टर्म आता दूर नाही. आमच्या तिसऱ्या कार्यकाळात वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढेल, सर्व कामे वेगाने सुरू राहतील.
AI भारतात सर्वाधिक वापरले जाईल, येत्या 5 वर्षांत देशाला बुलेट ट्रेनची भेट मिळेल, येत्या 5 वर्षात प्रत्येक घराला पाईपलाईनद्वारे गॅस दिला जाईल, देशातील गरिबांसाठी पक्की घरे बांधणे सुरुच राहणार, देशातील गरिबांना मोफत धान्य देणे, मोफत उपचार देणे सुरुच राहील.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, देशाच्या विकासासाठी राज्याचा विकास गरजेचा आहे. आपल्या राज्यांनी सकारात्मक विचाराने वाटचाल करण्याची गरज आहे, असे मी नेहमी म्हणत असे. राज्यांच्या विकासातूनच आपण देशाचा विकास करू शकतो. राज्याने एक पाऊल टाकले तर आम्ही दोन पावले टाकू, अशी ग्वाही मी देतो.
धोरण आणि बांधणी ही नव्या भारताची नवी दिशा दाखवणारी आहे. मूलभूत सुविधा पुरविण्यावर आमचा भर आहे. प्रत्येक कुटुंबाचे जीवनमान उंचावले पाहिजे. जीवनाचा दर्जा सुधारणे, ही काळाची गरज आहे.
आगामी काळात जीवनमानाच्या दिशेने पूर्ण ताकदीनिशी वाटचाल करू. येणारी 5 वर्षे मध्यमवर्गाला नव्या उंचीवर घेऊन जाणारी आहेत. त्यामुळेच आम्ही सामाजिक न्यायाची ढाल आणखी मजबूत करू.
जेव्हा आपण म्हणतो की, 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले, तेव्हा विरोधक म्हणतात, मग 80 कोटी लोकांना मोफत धान्य का देता? तर, त्यांना पुन्हा संकटाचा सामना करावा लागू नये, ते पुन्हा गरिबीत जाऊ नयेत, म्हणून आम्ही ही योजना देत आहोत. यापुढेही आम्ही देशाच्या कानाकोपऱ्यातील गरिबांला धान्य देत राहू. शरीराचा एक भाग काम करत नसेल, तर संपूर्ण शरीर अक्षम मानले जाते.
देशाचा कोणताही भाग विकासापासून वंचित राहिला तर भारताचा विकास होऊ शकणार नाही. भारताच्या कोणत्याही कोपऱ्यात वेदना होत असतील, तर प्रत्येकाला त्या वेदना जाणवल्या पाहिजेत, असंही मोदी यावेळी म्हणाले.