माजी खासदार निलेश राणे यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याचं वृत्त आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्या चिपळूणमधील कार्यालयासमोर निलेश राणे यांचा ताफा आला. त्यावेळी ही दगडफेक झाल्याचं सांगण्यात येत आहे. दगडफेकीत अनेक वाहनांच्या काचा आणि घरांच्या खिडक्या फुटल्या आहेत. निलेश राणे यांच्या आजच्या सभेच्या पार्श्वभूमीवर चिपळूण मध्ये दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले. या परिसरात प्रचंड तणाव आहे, त्यामुळे पोलिसांनी अश्रूधुराच्या कांड्या फोडून जमावाला हटवण्याचा प्रयत्न केला.
भास्कर जाधव यांनी उद्धव ठाकरेंच्या कोकण दौऱ्यावेळी नारायण राणे पिता पुत्रांवर तुफान टीका केली होती. त्याला उत्तर म्हणून निलेश राणे यांनी गुहागरमध्ये आज सभेचं आयोजन केलं आहे.
दरम्यान, आमदार भास्कर जाधव यांना धमकीचे फोन आणि मेसेज आल्याने त्यांच्या कार्यालय बाहेर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.