शेअर ट्रेडिंगचे आमिष दाखवून वृद्धाला  पावणेचार कोटींचा ऑनलाईन गंडा
शेअर ट्रेडिंगचे आमिष दाखवून वृद्धाला पावणेचार कोटींचा ऑनलाईन गंडा
img
दैनिक भ्रमर
नाशिक (प्रतिनिधी) :- शेअर मार्केट ट्रेडिंग करण्याचे आमिष दाखवून सायबर भामट्यांनी एका वृद्धास पावणेचार कोटी रुपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की आरोपी ब्लॅक रॉक कॅपिटल सिक्युरिटीज्‌‍ मार्केट्स पुल अप टीम नावाच्या ग्रुपमधील व्हॉट्सॲप क्रमांकधारक अज्ञात इसमाने फिर्यादी जितेंद्र शेवंतीलाल शाह (वय 68, रा. अरिहंत प्लाझा, अंबड, नाशिक) यांच्याशी संपर्क साधला. त्याने शाह यांना वेळोवेळी वेगवेगळ्या व्हॉट्सॲप क्रमांकांवरून शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास जादा नफा मिळू शकतो, असे सांगितले.

त्यानुसार आरोपींवर विश्वास ठेवून फिर्यादी शाह यांनी वेगवेगळ्या व्हॉट्सॲप क्रमांकधारकांच्या बँक खात्यांवर दि. 12 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2024 या कालावधीत इंटरनेट व फोनद्वारे सुमारे 3 कोटी 70 लाख रक्कम वर्ग केली; मात्र बरेच दिवस होऊनही नफ्यासह मूळ रक्कम परत मिळत नसल्याने फसवणूक झाल्याची बाब फिर्यादी शाह यांच्या लक्षात आली. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात भामट्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेख करीत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group