राज्यातील विर्दभात निवडणूक प्रचार रंगू लागला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज (ता. ८) चंद्रपुरात जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. दुपारी ४ वाजता मोरवा विमानतळाजवळील भव्य पटांगणावर ही सभा होणार आहे. दहा वर्षांनंतर मोदी चंद्रपुरात येत आहेत.
चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाचे भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना, मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी ते येत आहेत. सभेसाठी प्रशासनाकडून चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचा २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत पराभव झाला होता. काँग्रेसचे बाळू धानोरकर यांच्या विजयाने भाजपचे काँग्रेसमुक्त महाराष्ट्र करण्याचे स्वप्न भंगले होते.
हा पराभव भाजप पक्षश्रेष्ठींच्या चांगलाच जिव्हारी लागला. त्यानंतर चंद्रपूरची जागा कोणत्याही परिस्थितीत जिंकायची या दिशेने प्रयत्न सुरू करण्यात झाले. खुद्द मोदी यांनी चंद्रपूर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात तगडा उमेदवार देण्याच्या उद्देशातून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवडणूक लढण्याचे आदेश दिले. मुनगंटीवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल करून प्रचार सुरू केला आहे. चंद्रपूरची जागा कोणत्याही परिस्थितीत जिंकण्याचा निर्धार भाजपने केला आहे. त्यासाठी मोदी यांची उद्या येथे जाहीर सभा होत आहे. पंतप्रधान आशीर्वाद देण्यासाठी येत असल्याने मला अतिशय आनंद होत आहे, अशा भावना मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.