अंधेरी पश्चिमधील एका बारमध्ये हुक्का विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर कारवाई करण्यास गेलेल्या पोलिसांना बार मॅनेंजरने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी त्या बार मॅनेंजरला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार पोलीस शिपाई समाधान पाटील अंबोली पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांना हुक्का तपासणी करण्यापासून रोखणाऱ्या व मारहाण करणारा व्यवस्थापक जॉन नॉर्बर्ट फर्नांडिस याला अंबोली पोलिसांनी अटक केली आहे.
अंधेरी पश्चिमेत आंबोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत 'द लिटिल डोर बार'मध्ये हुक्का विक्री चालू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर कारवाई करायला गेलेल्या पोलिसांना बार मॅनेजरकडून शिवीगाळ करून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. बारमध्ये हा गोंधळ सुरू असताना पोलिस स्टेशनमधून अतिरिक्त कुमक मागवण्यात आली. त्यानंतर मोठ्या संख्येने पोलिस कर्मचारी या बारमध्ये दाखल झाले आणि त्यांनी बारची तपासणी केली. नंतर पोलिसांनी मारहाण करणाऱ्या त्या बार मॅनेजरलाही अटक केली.
जॉन नॉर्बर्ट फर्नांडिस असे अटक केलेल्या बार मॅनेजरचे नाव आहे. बार मॅनेजरकडून पोलिसांवर झालेल्या हल्ल्यामुळे पोलिसांमध्ये नाराजीचा सूर आहे. आंबोली पोलिसांनी बारवर कारवाई करत हा बार तीन दिवसांसाठी बंद केला आहे.