महायुतीत असलेले आमदार रवि राणा म्हणाले की, 'आशीर्वाद दिला नाही, तर 1500 रुपये परत घेऊ.' दुसरीकडे आमदार महेश शिंदेंनीही वादग्रस्त विधान केले. त्यामुळे विरोधकांना आयत कोलीत मिळाले. या वाचाळ नेत्यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेत कानउघाडणी केली. जळगाव येथील कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सुनावले.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
फडणवीस म्हणाले, "परवा एक नेते म्हणाले की १५०० रुपयात काय होते? माझा त्यांना सवाल आहे की, तुम्हाला संधी मिळाली होती. फुटकी कवडीही तुम्ही आमच्या माता-भगिनींना दिली नाही. आता आम्ही १५०० रुपये देत आहोत. तुमच्या पोटात का दुखतंय? भगिनींनो, या सावत्र भावांपासून तुम्हाला सावधान राहावं लागेल. ज्यांना तुम्हाला मिळणारे १५०० रुपये पचत नाहीयेत."
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, "दादा (अजित पवार) म्हणाले तेही खरं आहे. आमचेही काही मित्र गंमतीत बोलताना काही बोलतात. कुणीतरी म्हणत पैसे वापस घेऊ."
महायुतीच्या नेत्यांना फडणवीसांचे खडेबोल
"अरे वेड्यांनो, या देशात भाऊबीज कधीच परत घेतली जात नाही. एकदा भाऊबीज दिली की, त्याच्या बदल्यात केवळ माया आणि माया मिळत असते. त्यामुळे काही झालं तरी या ठिकाणी एक गोष्ट सांगतो. निवडणुका येतील जातील. कुणी मत देईल, देणार नाही; पण मला विश्वास आहे की, मायमाऊलींचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असेल. जोपर्यंत हे त्रिमुर्तींचं सरकार आहे, तोपर्यंत मायमाऊलींची योजना कुणाचा बाप बंद करू शकणार नाही."