Nashik Crime News : कोर्‍या कागदावर सही केली नाही म्हणून कामगारास मारहाण
Nashik Crime News : कोर्‍या कागदावर सही केली नाही म्हणून कामगारास मारहाण
img
दैनिक भ्रमर

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- कामावरून काढून टाकतो, असे सांगून कोर्‍या कागदावर सही केली नाही, म्हणून एका कामगाराला कमरेच्या पट्ट्याने मारहाण केल्याची घटना अंबड एम. आय. डी. सी. मध्ये घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी मोहन रघुनाथ गावित (वय 24, रा. दत्तनगर, कारगिल चौक, अंबड, मूळ रा. सांगवी, ता. शिरपूर, जि. धुळे) हा तरुण अंबड एम. आय. डी. सी. येथे फॉर्च्युना कंपनीमध्ये काम करतो. दि. 12 ऑगस्ट रोजी गावित हे कंपनीत काम करीत असताना कंपनीतील दुसरा कर्मचारी वारे हा त्याच्याजवळ आला. “तुझे साहेब कुठे गेले?” असे विचारले. त्यावर “मला माहीत नाही,” असे त्याने सांगितले. त्यानंतर फिर्यादी मशीनवर काम करीत असताना त्याच कंपनीतील आरोपी कर्मचारी डांगे फिर्यादीजवळ आले व त्याला टोमणे मारू लागले व त्यानंतर त्याला जातिवाचक शब्द वापरून “तुला कंपनीतून काढून टाकतो. तू या कोर्‍या कागदावर सही कर,” असे सांगितले; मात्र फिर्यादीने सही करण्यास नकार दिला, याचा राग मनात धरून आरोपी डांगे याने कमरेचा पट्टा काढून त्याला मारहाण केली.

इतर साहेबांना सांगून “तुला कामावरून काढून टाकतो,” अशी धमकी दिली. त्यानंतर घाबरलेला फिर्यादी हा तेथून पळून कंपनीबाहेर निघून गेला. तो सिमेन्स कंपनीजवळील नाल्यापासून घरी जात असताना तीन मुले तोंडाला रुमाल बांधून आली व त्यांनी फिर्यादी गावित याला लोखंडी रॉड व कमरेच्या पट्ट्याने मारहाण केली. या टोळक्यापासून कशीबशी सुटका करून घेत फिर्यादी हे त्यांचा मित्र सुलंदर जोगारे याच्या घरी केले; परंतु तो घरी नसल्याने फिर्यादीने कॉन्ट्रॅक्टर किशोर पवार यांना फोन करून माहिती दिली.

ते एम. आय. डी. सी. पोलीस चौकीत तक्रार देण्यासाठी गेले; परंतु गंभीर मारहाण झाल्याने कॉन्ट्रॅक्टर किशोर पवार यांनी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रथमोपचार करून त्याला अधिक उपचारासाठी सातपूरच्या साईनाथ हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात आरोपी डांगे व इतर तीन अनोळखी इसमांविरुद्ध मारहाणीसह अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त देशमुख करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group