जायखेडा येथील साल्हेर किल्ल्याच्या पठारावर शुक्रवारी दोन पुरुषांचे मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळले होते. या दोघांचा खून झाल्याचे प्रथमदर्शनी पोलिसांना संशय आला.
याप्रकरणी पोलिसांनी विश्वास दामू देशमुख (३६, रा. केळझर, ता. सटाणा), तानाजी आनंदा पवार (३६, रा. खालप, ता. देवळा), शरद उर्फ बारकु दुगाजी गांगुर्डे (३०, रा. बागडु, ता. कळवण), सोमनाथ मोतीराम वाघ (५०), गोपीनाथ साेमनाथ वाघ (२८, दोघे रा. गोपाळखडी, ता. कळवण) व अशोक महादू भोये (३५, रा. सावरपाडा, ता. कळवण) या 6 जणांना अटक केली आहे.
याबाबत अधिक साल्हेर किल्ल्याच्या पठारावर शुक्रवारी दोन पुरुषांचे कुजलेले मृतदेह आढळून आले होते. दोघांच्या डोक्यावर, चेहऱ्यावर, मानेवर शस्त्रांचे वार केल्याचे आढळून आले. मृतदेहांच्या वस्त्र व इतर चीजवस्तूंवरून पोलिसांनी मृतांची ओळख पटवली. त्यात रामभाऊ गोटीराम वाघ (६०, रा. गोपाळखडी, ता. कळवण) व नरेश रंगनाथ पवार (६३, रा. ता. कळवण) अशी दोघांची नावे समाेर आली. त्यानुसार जायखेडा पोलिस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्यांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरु केला.
पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजू सुर्वे, जायखेडा पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांच्या पथकांनी तपास करुन रामभाऊ वाघ व नरेश पवार हे दोघेही १३ नोव्हेंबरपासून बेपत्ता असल्याची नोंद अभोणा पोलिस ठाण्यात होती हे समजले. दोघेही दुचाकीवरून सटाण्याच्या दिशेने गेल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार पोलिसांनी सखोल चौकशी करून साल्हेर किल्ला व केळझर धरण परिसरात सापळे रचून सहा संशयितांना अटक केली.
दरम्यान, सहायक पोलिस निरीक्षक संदेश पवार, उपनिरीक्षक दत्ता कांभीरे, सहायक उपनिरीक्षक नवनाथ सानप, शिवाजी ठोंबरे, हवालदार गिरीष निकुंभ, शरद मोगल, सुधाकर बागुल, प्रशांत पाटील, तांत्रिक विश्लेषण शाखेचे हवालदार हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम यांच्या पथकाने या दुहेरी खुनाच्या गुन्ह्याची उकल केली.
हे कारण पोलीस तपासात आले समोर
तपासात विचारपूस केली असता यातील संशयित सोमनाथ मोतीराम वाघ व मयत रामभाऊ गोटीराम वाघ यांच्यात जमिनीच्या मालकी हक्कावरून वाद होता. मयत रामभाऊ यास त्याचा मित्र नरेश पवार हा सदर वादात कळवण कोर्टात मदत करीत होता.
या रागातून सोमनाथने संशयितांची जमवाजमव करून दोघा मयतांना धनाचा साठा आहे असे सांगून साल्हेर किल्ल्यावर बोलावले. दोघांना काठी, कुऱ्हाड व दगडाने डोक्यावर, मानेवर व अंगावर मारून त्यांची निर्घृण हत्या केली.