आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील विविध राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सध्या सर्वच राजकीय नेते हे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांची पाहणी करत मतदारसंघांची चाचपणी करत आहेत. तर काही पक्षात इनकमिंग आऊटगोईंगला सुरुवात झाली आहे. त्यातच आता काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याने खळबळजनक दावा केला आहे.
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे, असा दावा एका काँग्रेस नेत्याने केला आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही. त्यातच आता माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या हालचालींना वेग आल्याचा दावा केला आहे.
“महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती निराशाजनक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे, बदलापुरात झालेली घटना यामुळे सरकारच्या कार्य पद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. या नकारात्मक वातावरणातून सुटका करून घेण्यासाठी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाणार आहे”, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होणार का?
महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. हरियाणा विधानसभेची मुदतही 3 नोव्हेंबरपर्यंत आहे. त्यामुळे या दोन राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. तसेच 4 जानेवारी 2025 पर्यंत झारखंड विधानसभेची मुदत आहे. यंदा दिवाळी 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत आहे. सणासुदीच्या काळात निवडणुका घेतल्या जात नाहीत. त्यामुळे दिवाळीच्या आधी किंवा दिवाळीच्या नंतर नोव्हेंबर महिन्यात निवडणुका होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र निवडणुकांच्या तारखा पुढे ढकलल्याने महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होणार का? अशा चर्चांना उधाण आले आहे.