गर्भवती महिलेचा आणि तिचा बाळाचा प्रसूती वेळी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अमरावतीमधील मेळघाट येथे घडली आहे . आदिवासी बहुल भागात गर्भवती महिला आणि बाळाचा मृत्यू झाला आहे. हा सगळा प्रकार आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळे झाला असल्याचा आरोप या महिलेच्या कुटुंबाने केला आहे. वेळेवर ॲम्बुलन्स न मिळाल्याने एका वीस वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.
या विषयी अधिक माहिती अशी की, मेळघाटातील काटकुंभ उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या दहेंद्री येथील कविता अनिल साकोम या वीस वर्षीय महिलेला ॲम्बुलन्स न मिळाल्याने शनिवारी दुपारी घरीच प्रसूती झाली, ज्यामुळे बाळाचा पोटातच मृत्यू झाला. बाळाचा तर जीव गेला कविता तरी जिवंत राहावी म्हणून तिच्या कुटुंबीयांनी ॲम्बुलन्स न मिळाल्याने खाजगी वाहन करून चूर्णी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
मात्र प्रकूर्ती खालावल्याने चुर्नी येथील डॉक्टरांनी अचलपूर येथे तर अचलपूरच्या डॉक्टरांनी अमरावती जिल्ह्यातील रुग्णालयात रेफर केलं. उपचारादरम्यान रविवारी पहाटे कविता साकोम या मातेचाही मृत्यू झाला. दहेंद्री गावात आरोग्य विभागाने ॲम्बुलन्स उपलब्ध करून दिली असती, तर कदाचित महिलेचा जीव वाचला असता, असा तिच्या घरच्यांनी आरोप केला. तसेच , तीन दिवसांपूर्वी सोनोग्राफीसाठी सुद्धा आरोग्य विभागाने ॲम्बुलन्स उपलब्ध करून दिलेली नव्हती असा आरोप महिलेच्या सासू आणि पतीने केला आहे.