नाशिक :- शहरातील जुने नाशिक परिसरातील बुधवार पेठ मधील चव्हाटा भागात एका घराला भीषण आग लागली. गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याचे समजते.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, की चव्हाटा भागात आज सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास देवी मंदिराजवळ पद्मा ज्वेलर्स जवळ एक इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील एका घराला सिलिंडरचा स्फोट होऊन आग लागली. यावेळी घरात कोणी नसल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही. ही आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. आग लागल्याचे समजताच अग्निशमन दलाचे दोन बंब आग विझवण्यासाठी दाखल झाले होते. आग विझवताना अग्निशमन दलाचे जवान इसाक शेख, आकाश गिते व प्रथमेश वाघ हे किरकोळ जखमी झाले. त्यांना प्रथमोपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.