मराठी चित्रपटसृष्टीमधून अतिशय दु:खद बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन झालं आहे. अतुल परचुरे मधल्या काळात कॅन्सरने त्रस्त होते. पण गेल्या वर्षी त्यांनी कॅन्सरवर यशस्वी मात केली होती. अतुल परचुरे यांनी कॅन्सरवर मात करत पुन्हा शूटिंगला सुरुवातही केली होती. ते अनेक कार्यक्रमांमध्ये प्रेक्षकांच्या समोर आले होते. वयाच्या 57 व्या वर्षी त्यांचं निधन झालं आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांना कॅन्सरची लागण झाली होती आणि त्यांची ट्रिटमेंट देखील सुरू होती. पण आज 14 ऑक्टोबरला त्यांची कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली आणि त्यांचं निधन झालं.
बालकलाकार म्हणून त्यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात केली. त्यांनी अनेक नाटक आणि मालिकांमध्ये काम केलं. शिवाय चित्रपटात देखील त्यांच्या वेगवेगळ्या भूमिका गाजल्या. अतुल परचुरे यांची ‘जागो मोहन प्यारे’ ही मालिका ही हिट ठरली, ज्यामुळे ते लोकांच्या घरोघरी पोहोचले.
अतुल परचुरे हे त्यांच्या विनोदी पात्रांसाठी ओळखले जातात. त्यांच्या अचूक कॉमेडी टायमिंगने त्यांनी लोकांना पोट धरून हसायला भाग पाडलं. पण लोकांना हसवणारा या कलाकाराने मात्र आज त्यांच्या चाहत्यांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे.
मराठी सिनेसुष्टीत त्यांनी ‘नवरा माझा नवसाचा’, ‘आम्ही सातपुते’, ‘दत्तोबा’, ‘लिंगप्पा कैकिनी’ यांसारखे सिनेमे केले आहेत.मराठीच नाही तर त्यांनी हिंदी सिनेमात देखील आपली ओळख निर्माण केली आहे. ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’, ‘मेरी प्यारी बहनिया बनेगी दुल्हनिया’, ‘क्यो की मैं झुठ नहीं बोलता’, ‘स्टाइल’, ‘क्या दिल ने कहा’, ‘चोर मचाये’ यांसारख्या सिनेमांचा समावेश आहे.