अनेक मुलांचे आई वडील त्यांच्या मनाविरुद्ध लग्न ठरवतात, तेव्हा काही जण गपचूप आपल्या घरच्यांचे म्हणणे मान्य करून मन मोडून लग्न करून घेतात पण काही जण मात्र यातून माघार घेतच नाही आणि त्यासाठी आपले स्वतःचे असे वेगळेच मास्टर प्लॅन बनवत असतात अशीच एक घटना मध्य प्रदेशातल्या ग्वाल्हेर शहरात घडली आहे.
शहरातल्या नारायण विहारमध्ये राहणारी एक मुलगी घरातले पैसे आणि दागिने घेऊन प्रियकरासह फरार झाली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच तिचा एका तरुणाशी साखरपुडा झाला होता. मुलीचे वडील दिल्लीतल्या कॉल सेंटरमध्ये कॅब ड्रायव्हर आहेत. पत्नी, मुलगा आणि दोन मुलींसह ते ग्वाल्हेरमध्ये राहतात.
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, फरार झालेली मुलगी इयत्ता बारावीमध्ये शिकत होती. जवळच राहणाऱ्या मोहन लाल नावाच्या व्यक्तीशी तिचे प्रेमसंबंध होते. तिच्या कुटुंबीयांना हे संबंध मान्य नव्हते. त्यामुळे त्यांनी सहा दिवसांपूर्वीच तिचा मुरार इथल्या एका तरुणाशी साखरपुडा केला होता. त्या वेळी घरच्यांनी तिचा होकार- नकारही विचारला होता. तेव्हा ती म्हणाली होती, की तिला भूतकाळ विसरून नवीन सुरुवात करायची आहे.
साखरपुडा झाल्यानंतर मुलीचे कुटुंबीय लग्नाच्या तयारीत व्यग्र होते. मुलीने मात्र प्रियकरासोबत वेगळाच प्लॅन आखला होता. शनिवारी (12 ऑक्टोबर) मुलीने सर्वांसाठी बटाट्याचे पराठे बनवले होते. त्यामध्ये तिने नशा येणारा पदार्थ मिसळला होता. पराठे खाऊन सर्व जण आपापल्या खोलीत झोपायला गेले. सकाळी उठल्यानंतर त्यांना आढळलं, की मुलगी घरातून नाहीशी झाली होती. घरातलं सामान विखुरलेलं होतं आणि लॉकरमधून एक लाख रुपये आणि दागिने नाहीसे झाले होते. शिवाय घरापासून जवळ राहणारा तिचा प्रियकरही बेपत्ता होता. यावरून त्यांच्या लक्षात आलं, की मुलगी प्रियकरासह फरार झाली आहे.
दरम्यान , मुलीच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री तिने सर्वांसाठी बटाट्याचे पराठे केले होते. तिने सर्वांना खाऊ घातले; पण स्वत: खाल्ले नव्हते. तिने त्यात नशा येणारा पदार्थ मिसळला असेल, याची आम्ही कल्पनाही केली नव्हती. सकाळी उठून बघितलं तर मुलगी रोख रक्कम आणि दागिने घेऊन फरार झाली होती.
या प्रकरणी मुलीच्या वडिलांच्या सांगण्यावरून आईने पोलीस तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या दोन टीम्स दोघांचाही शोध घेत आहेत. यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासलं जात आहे.