माजी महापौर दशरथ पाटील
माजी महापौर दशरथ पाटील "या" पक्षातून विधानसभा निवडणूक लढणार?
img
दैनिक भ्रमर
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- विधानसभा निवडणुकीचे पडघम संपूर्ण राज्यात वाजू लागलेले असतानाच नाशिकमध्येही अनेक नेते या निवडणूक रिंगणात बाशिंग बांधून उतरण्याच्या आहेत. नाशिकचे माजी महापौर दशरथ पाटील हे देखील विधानसभा निवडणुकीत इच्छुक उमेदवार आहेत. त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून चाचपणी सुरू केली आहे. दरम्यान, आज त्यांनी पुणे येथे स्वराज्य पक्षाचे संस्थापक संभाजीराजे भोसले यांची सदिच्छा भेट घेतली. त्यामुळे शहरात पुन्हा एकदा चर्चेचे वादळ सुरू झाले.

शिवसेनेत असताना माजी महापौर दशरथ पाटील यांनी आपली कारकीर्द गाजविली होती. महापालिकेतील अधिकाऱ्यांवर चांगली जरबदेखील तयार केली होती. त्यानंतरच्या कार्यकाळात लोकसभा-विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी प्रयत्न केले. पक्षाबरोबर राहून आणि नंतर पक्षाला सोडून त्यांनी मतदारांचा कौल मिळविण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेनंतर काँग्रेस पक्षात गेलेले दशरथ पाटील तेथे फारसे रमले नाही. त्यांनी स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला मात्र स्वकीयांकडून देखील विरोध झाल्याने तटस्थची भूमिका घेत लोकसभा निवडणुकीत उभे राहण्याचा निर्णय घेतला. मात्र, कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेत त्यांनी लोकसभा न लढविण्याचा निर्णय घेतला. मात्र, आपण विधानसभा निवडणुक नक्की लढणार असेही त्यांनी त्यावेळी जाहीर केले होते. त्यांना मनासारखे वातावरण व मनासारखी परिस्थिती दिसत नसल्याने आता पुन्हा यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी इच्छुक म्हणून प्रयत्न सुरू केले आहे.

दरम्यान दशरथ पाटील हे पुणे येथील त्यांच्या नातेवाईकांकडे गेले असता स्वराज्य पक्षात काम करणारा त्यांच्या पुतण्याने संभाजी राजे आज पुण्यात आहेत आपण त्यांची भेट घेऊ असे सांगितले. क्षणाचा ही विलंब न करता दशरथ पाटील यांनी पुतण्या समवेत पुणे येथील स्वराज्य पक्षाच्या कार्यालयात जाऊन संस्थापक संभाजी राजे भोसले यांची भेट घेतली. यासंदर्भात आपली भेट राजकीय नसून केवळ सदिच्छा भेट असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
त्यांच्या व संभाजीराजेंच्या भेटीमुळे ते स्वराज्य पक्षात जाणार आणि नाशिक पश्चिम मधून निवडणूक लढवणार अशी चर्चा नाशिक शहरात सुरू झाली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group