राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली आहे. विरोधकांकडून वारंवार रश्मी शुक्ला यांच्या बदलीची मागणी केली जात होती. असं असतानाच केंद्रीय निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांची बदली केली आहे.
रश्मी शुक्ला यांच्या बदलीची मागणी काँग्रेसने केली होती. रश्मी शुक्ला यांच्यावर विरोधकांचे फोन टॅप केल्या प्रकरणी गुन्हे दाखल होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रश्मी शुक्ला यांच्या बदलीची मागणी केली. शुक्ला यांची तातडीने बदली करावी, अशी मागणी पटोले यांनी पत्र लिहित निवडणूक आयोगाला केली. त्यानंतर आता निवडणूक आयोगाने या तक्रारीची दखल घेत रश्मी शुक्ला यांच्या बदलीचे आदेश काढले आहेत.
उद्या (5 नोव्हेंबर) दुपारी 1 वाजेपर्यंत तीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची नावे राज्याच्या प्रशासनाने केंद्रीय निवडणूक आयुक्तांना पाठवायचे आहेत. त्यानंतर राज्याच्या नव्या पोलीस महासंचालकांची निवड केली जाणार आहे.
दरम्यान , रश्मी शुक्ला यांची सेवा जून 2024 रोजी समाप्त झाली असतानाही भाजप, युती सरकारने जानेवारी 2026 पर्यंत त्यांना नियमबाह्य बढती दिली होती, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता. तसंच रश्मी शुक्ला यांची कार्यपद्धती अत्यंत वादग्रस्त राहिली असून नियमबाह्य कामे करणे तसेच विरोधी पक्षांतील नेत्यांना धमकावण्याची कामे त्यांनी केली आहेत, असाही आरोप नाना पटोलेंनी केला होता.