बीड मधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकारणानंतर धनंजय मुंडे यांच्यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. तसेच त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही केली जात आहे.
दरम्यान , धनंजय मुढे यांच्या अडचणीत सातत्याने वाढ होत असून आता धनंजय मुंडेंच्या पत्नी करुणा शर्मांनी वांद्र्याच्या कौटुंबिक कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय देण्यात आला आहे. करुणा शर्मा या धनंजय मुंडेंच्या पत्नी असून त्यांना महिन्याला 2 लाख रुपयांची पोटगी देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. याशिवाय मुलीला लग्नापर्यंत 75 हजार रुपये देण्यात यावेत, असे आदेशही कोर्टाने दिले आहेत.
दरम्यान, न्यायालयाच्या या आदेशानंतर धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांचा मुलगा श्रीशिव मुंडे याने आईविरोधातच सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. आईने आपल्याला घराबाहेर काढलं, तसंच 2020 पासून आमचे वडीलच आमची काळजी घेत आहेत, अशी पोस्ट श्रीशिव मुंडेने केली आहे. मुलाने केलेल्या या पोस्टवर करुणा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुलावर धनंजय मुंडेंकडून दबाव असल्याचा आरोप करुणा शर्मा यांनी केला आहे.
‘मुलाने असं सांगितलं, कारण त्याला कुठे ना कुठे त्रास होत आहे. मुलावर दबाव होता, त्याला कॉल येत होते. कॉल ऐकून ऐकून तो दडपणात होता. ही गोष्ट माझ्या नवऱ्याला कळत नाही. माझ्या आणि नवऱ्यामधल्या वादामुळे मुलांना त्रास होत आहे. माझी मुलं नवरा मला कोर्ट केस मागे घ्या, असं सांगत आहेत. मीही वाद संपवण्यासाठी तयार आहे. मुला बाळांना इतका त्रास होत आहे. मी अजून तोंड उघडलं नाही, तर यांना मिर्ची लागते, की माझ्या मुलावर हे बोला ते बोला म्हणून दबाव टाकतात. माझा मुलगा असा नाही, कधी पोस्ट करणार नाही. माझ्याविरोधात कधी जाणार नाही, पण त्याच्यावरही दबाव आहे’, असं करुणा शर्मा म्हणाल्या.
‘धनंजय मुंडेंनी माझ्या मुलाला फोन केला आणि मीडियाला बाहेर काढायला सांगितलं, बाईट देऊ नका असं सांगितलं. मुलगा मुलगी खूप लहान आहे, आम्ही एकटे आहोत. मागच्या तीन वर्षांपासून ते खूप सहन करत आहेत. आईला दोनदा जेलमध्ये टाकणं मारहाण करणं, हे सगळं सुरू आहे. मुलं खूप लहान आहेत’, अशी प्रतिक्रिया करुणा शर्मा यांनी दिली आहे.