नाशिक : 5 हजारांची लाच घेताना शहादा येथील भूमिअभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.अभिजित अर्जुन वळवी (वय ४३, भुकर मापक, उप अधीक्षक भूमिअभिलेख कार्यालय, शहादा, तालुका शहादा, जिल्हा- नंदुरबार असे लाच घेणाऱ्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांची मालकीची हिंगणी शिवारात तालुका शहादा येथे गट नंबर 17 ही शेतजमीन आहे. यापूर्वी या शेताची वळवी यांनी मोजणी केली आहे. परंतु वळवी यांनी शेत मोजणीचे शीट तक्रारदार यांना दिलेले नाही. तक्रारदार यांनी त्यांच्या शेताच्या मोजणी बाबतचे शिट वळवी यांच्याकडे मागितले असता वळवी यांनी तक्रारदार यांना त्यांच्या शेतमोजणीचे मोजणी शिट देण्याच्या मोबदल्यात दहा हजार रुपयांची व तडजोडीअंती पाच हजार रूपयांची मागणी केली. वळवी यांनी आज दि. ६ रोजी तक्रारदार यांच्याकडून पाच हजार रुपये लाचेची रक्कम स्विकारली.
याबाबत शहादा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक राकेश चौधरी, पोनि नरेंद्र खैरनार, नेहा सूर्यवंशी, सपोऊपनि विलास पाटील, पोहवा हेमंत महाले, पोहवा विजय ठाकरे, पोहवा देवराम गावित, पोहवा संदीप खंडारे, पोहवा जितेंद्र महाले, पोहवा नरेंद्र पाटील , पोना सुभाष पावरा यांनी केली.