मनमाड : गेल्या काही दिवसांपासून शहरातील रस्त्याच्या कडेला लावलेल्या वाहनांच्या टाकी मधून इंधन चोरी करण्याचे प्रमाण वाढले असतानाच मनमाड पोलिसांनी वाहनाच्या इंधन टाकीतून इंधन चोरी करणाऱ्या एका युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,दत्तु शिवाजी भालशिंगे रा. बुरकुलवाडी मनमाड यांच्या मालकीचा टँकर हा चांदवड रोड वरील सरकार गॅरेज समोर उभा असतांना टँकरच्या टाकीमधुन डिझेल चोरी गेल्याने दत्तु शिवाजी भालशिंगे यांचे तक्रारी वरुन मनमाड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. सदर घटनेची तत्काळ दखल घेऊन तपास करीत असताना मनमाड - चांदवड महामार्गावर निमोण चौफुली येथे एक क्रुझर वाहन क्रमांक एम एच- २० सी एस -९७६१ हे संशयास्पदरित्या जाताना दिसले. पोलीस पथकाने वाहन चालकास थांबवुन त्याचेकडे चौकशी केली. परंतु वाहन चालक याने असमाधानकारक उत्तरे दिल्याने वाहनाची तपासणी केली असता वाहन मध्ये प्लॅस्टिकचे एकुन ०६ ड्रम आढळुन आले. पैकी ०२ ड्रममध्ये ४० लिटर डिझेल होते. तसेच हिरव्या रंगाचा पाईप, हिरव्या रंगाचा स्कू मिळुन आला. पोलीस पथकाने वाहन चालक अभिषेक गजेंद्र गडाख, वय ३२ वर्ष, रा. कोंबडवाडी, तिसगाव, ता. चांदवड, जिल्हा नाशिक याचे कडे कसुन चौकशी केली असता त्याने चांदवड रोडवरील सरकार गॅरेज समोर उभ्या असलेल्या टँकर मधुन डिझेल चोरी केले असल्याचे सांगितले. गुन्हा घडल्यानंतर ०२ तासाच्या आत गुन्हा उघडकीस आणण्यात पोलीस पथकास यश आल्याने सर्वत्र पोलीस प्रशासनाचे कौतुक होत आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन, पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी इमदार सैय्यद, पकंज देवकाते, संदिप झाल्टे, राजेंद्र केदारे, भाऊराव कोते, गौरव गांगुर्डे,रणजीत चव्हाण यांनी कारवाई केली आहे.