आजकाल रिल्स बनवणे हा लोकांचा फॅड झाला आहे. आपली रील जास्तीत जास्त व्हयरल व्हावी, आपल्या रील ला जास्तीत जास्त व्हिवज मिळावे म्हणून लोक वाटेल ते करायला तयार असतात. असाच एक प्रकार संभाजीनगर मध्ये घडला आहे. इन्स्टाग्रामवर भाईगिरी करत धारदार शस्त्र घेऊन रील बनविण्याचा धकाकदायक प्रकार घडला आहे.
धारदार शस्त्र घेऊन इन्स्टाग्रामवर रील बनवण्याचे प्रकार मागच्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत, अशी रील बनवून दहशत माजवणाऱ्यांवर पोलीस वेळोवेळी कारवाईही करत आहेत, पण तरीही हे प्रकार काही थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. या गावगुंडांना अद्दल घडवण्यासाठी पोलिसांनी चांगलीच शक्कल लढवली आहे.
इन्स्टाग्रामवर भाईगिरी करणाऱ्या तरुणांची छत्रपती संभाजीनगरमधल्या पोलिसांनी शहरभर धिंड काढली आहे. संभाजीनगरच्या पाचोड परिसरात हुल्लडबाज तरुणांकडून इन्स्टाग्रामवर रिल्स काढून दहशत पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या तरुणांनी हातात धारदार शस्त्र घेऊन सोशल मीडियावर रिल्स टाकली होती.
या रिल्समध्ये तरुणांनी कमरेला पट्टा, हातात कोयता, धारदार शस्त्र घेऊन कॉलर उडवत इन्स्टाग्रामवर रील व्हायरल केली होती. यानंतर पाचोड पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची पाचोड पैठण चौकातून धिंड काढली आणि मग त्यांना पोलीस स्टेशनला नेण्यात आलं. इन्स्टाग्रामवर भाईगिरी करणाऱ्या या तरुणांची भाईगिरी पोलिसांनी धिंड काढून उतरवली आहे.