राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने घवघवीत यश मिळविले असून महायुती सरकार स्थापन झाले आहे. दरम्यान आता महापालिकेच्या निवडणुका कधी होणार, असा प्रश्न सातत्याने उपस्थित होत आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून महापालिकेच्या निवडणुका कधी होतील, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. त्यातच आता सर्वच राजकीय पक्षांकडून राज्यातील महापालिकांच्या निवडणुकांच्या तयारीला सुरुवात झाली आहे. त्यातच आता भाजपच्या एका बड्या मंत्र्यांने स्वबळावर निवडणुका लढण्याबद्दल भाष्य केले आहे.
दुग्ध विकास व पारंपारिक ऊर्जा विभाग मंत्री अतुल सावे हे आज धारशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांबद्दल भाष्य केले. विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाची ताकद जास्त आहे हे दाखवून दिलं आहे. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महायुती मध्ये एकमत नाही झाले तर भाजप स्वतंञ लढणार, असे विधान अतुल सावे यांनी केले.
तसेच, सध्या भाजपची सदस्य नोंदणी सुरु आहे. लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात कमी नोंदणी झाली होती. त्यामुळे आज आम्ही बैठका घेऊन त्या नोंदणीचा पाठपुरावा केला. याबद्दलचा आढावा घेतला आणि आढावा घेऊन पुढच्या १० दिवसात नोंदणी पूर्ण करावी. भाजप नोंदणी झाल्यानंतर मंडळ अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष, प्रदेश अध्यक्ष या प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ही नोंदणी लवकरात लवकर व्हावी, असा आमचा आग्रह आहे, असेही अतुल सावे म्हणाले.
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची तयारी सुरु आहे. लोकसभा, विधानसभा अशी कोणतीही निवडणूक असली तरी तयारीही करावीच लागते. २५ फेब्रुवारीला जर कोर्टाचा निकाल आला तर त्यानंतर २ महिन्यांनी निवडणुका होतील. त्यामुळे त्याची तयारी आता करायला हवी. भाजपची ताकद आहे. विधानसभेत भाजपने ताकद दाखवली आहे. त्यामुळे जर आमच्या सर्वांचं एकमत नाही झालं तर आम्ही स्वबळावर लढू”, असेही अतुल सावेंनी म्हटले.