आजकाल फसवेगिरी, लूटमार आणि विशेषतः जादूटोण्याच्या नावाखाली फसवणुकीचे अनेक प्रकार घडत आहेत. भामटे कोणत्या ना कोणत्या मार्गांचा अवलंब करून अनेकांना लाखो करोडोंचा गंडा घालतात. दरम्यान जादूटोण्याच्या नावाखाली लाखोंचा गंडा घातला असल्याचा प्रकार बीड मध्ये घडला आहे.
बीड जिल्ह्यातील दिंद्रुडमध्ये जादूटोण्याच्या नावाखाली तब्बल 10 लाख 62 हजारांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी आरोपी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , बीडच्या माजलगाव तालुक्यातील नित्रुड गावात राहणाऱ्या संगीता परमेश्वर साखरे यांना एका महिलेने ‘तुमच्या घरासमोरील मोकळ्या प्लॉटमध्ये दोन किलो सोन्याच्या बिस्किटांचा हंडा आहे’ असे सांगितले. मात्र, तो काढण्यासाठी काही विधी करावे लागतील आणि तसे न केल्यास जीविताला धोका होईल, अशी भीती घातली. ही भीती दाखवून आरती मनोहर गायकवाड (रा. कोळपिंपरी, ता. धारूर) हिने वेळोवेळी फोन करून साखरे कुटुंबीयांकडून 27 सप्टेंबर 2024 ते 21 नोव्हेंबर 2024 या काळात ऑनलाइन आणि रोख स्वरूपात तब्बल 10 लाख 62 हजार रुपये घेतले.
वारंवार पैसे उकळत असून लक्षात येताच आरती यांनी तक्रार दाखल करण्याचे ठरवले. शेवटी फसवणुकीची तक्रार दाखल केली. त्यानंतर मरणाची भीती दाखवली. दुसऱ्याकडून उसने पैसे आणले आहेत आता ते पैसे परत कसे करायचे. संगीता साखरे यांनी फसवणुकीची तक्रार दिंद्रुड पोलिस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. तिच्यावर महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायदा 2013 आणि भारतीय न्याय संहितेच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा अत्यंत गंभीर प्रकार असून या प्रकरणातील आरोपीचे मोठे जाळे असू शकते. त्यामुळे याबाबतीत कठोर कारवाई व्हावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या आणि अंधश्रद्धा निर्मूलन समित कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल यांनी सांगितलं. यासंदर्भात दिंद्रुडचे पोलीस निरीक्षक यांना विचारणा केली असता आरोपीला अटक केली आहे तपास सुरू आहे यावर आत्ताच प्रतिक्रिया देणार नाही असं सांगितलं. दरम्यान ,सोने मिळेल या आमिषाने अशा जादूटोण्याच्या जाळ्यात अडकणाऱ्या लोकांची संख्या अजूनही कमी झालेली नाही. त्यामुळे सावध राहा आणि अशा फसवणुकीच्या घटना लगेच पोलिसांना कळवा, असे आवाहन करण्यात आले आहे.