महिला अत्याचाराचा प्रश्न ऐरणीवरून असून, आजची स्त्री ही कुठेही सुरक्षित नाही, कामाचे ठिकाण असो, शैक्षणिक ठिकाण असो एवढेच नव्हे तर ती स्वतःच्या घरात सुद्धा सुरक्षित नाही. अशीच एक संतापजनक घटना समोर आली आहे.
जालना शहरातील नवीन मोंढा परिसरात राहणाऱ्या एका नराधम बापाने स्वतः च्या जन्मदात्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला असल्याची तक्रार पीडित मुलगी आणि तिच्या आईने चंदनशिरा पोलीस स्थानकात केली आहे. पिडीतेने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच घटनेची गांभीर्यता लक्षात घेऊन आरोपी पित्याला पोलिसांनी तत्काळ बेड्या ठोकल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, नवीन मोंढा परिसरातील हनुमाननगर येथे राहणाऱ्या नराधम आरोपीने स्वतःच्या अल्पवयीन मुलीला स्वतःच्या मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ दाखवून लैंगिक अत्याचार केला. तसेच घटनेची वाच्यता केल्यास गळा दाबून जीवे मारण्याची धमकी दिली.
याबाबत पीडित मुलीने आपल्या आईला सांगितल्यानंतर पीडिता आणि तिची आई दोघींनी पोलीस स्थानक चंदनझिरा जालना येथे केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपी नराधम बापाविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि पोकसो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपीला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश मिळालं आहे.