येवला : मध्य प्रदेश राज्यातील विदेशी मद्यसाठयाची महाराष्ट्रात अवैधरित्या होत असलेल्या वाहतुकी विरोधात राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभागाच्या भरारी पथकाने येवला येथे मोठी कारवाई केली असून या कारवाईत सुमारे १ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या माहितीनुसार आहिल्यानगर मनमाड महामार्गावर येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल शिवारात हॉटेल साई सावनच्या जवळ वाहन तपासणी सुरू असताना मध्य प्रदेशात निर्मित महाराष्ट्रात विक्रीस प्रतीबंधीत व केवळ मध्य प्रदेश राज्यातच विक्री करीता असलेला मुद्देमाल कंटेनरसह जप्त करण्यात आला आहे यात मध्य प्रदेश राज्यात निर्मीत विदेशी मद्य ११४१ बॉक्स तपकीरी रंगाची आयशर कंपनीची एम एच २० इ एल ६७९१, एक मोबाईल संच असा एकूण १ कोटी ७ लाख ७२ हजार ८८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून याप्रकरणी शंभुसिंह भेरूसिंह राजपुत (वय ३३) बस्सी पो.ता. सलंबर, जि. उदयपुर, राज्य. राजस्थान याला ताब्यात घेण्यात आले असून अज्ञात वाहनमालक फरार झाला असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
राज्य उत्पादन शुल्क आयुक्त विजय सूर्यवंशी,सहआयुक्त प्रसाद सुर्वे, उषा वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय भरारी पथकाचे प्रभारी निरीक्षक किरण धिंदळे, दुय्यम निरीक्षक पी. आर. मंडलिक, डी. बी. कोळपे, सहायक दुय्यम निरीक्षक. किरण गांगुर्डे, जवान धनराज पवार, महेश सातपुते, युवराज रतवेकर, राहुल पवार, विलास कुवर, सुनिता महाजन, मुकेश निंबेकर यांनी यशस्वीरित्या पार पाडली.या गुन्हयाचा पुढील तपास किरण धिंदळे हे करत आहेत.