प्रवासी रेल्वे गाड्यांमध्ये नेहमीच चोरी होण्याचे घटना घडत असतात मात्र हैदराबाद-हिस्सार एक्सप्रेसमध्ये चोरी करणाऱ्या महिलांच्या टोळीला रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिसांच्या पथकाने पकडून मनमाड लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले असून या चारही महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. चारही संशयित आरोपींना न्यायालयात हजर केले असता एका महिलेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून उर्वरित तीन महिलांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
हैद्राबाद येथील कन्हैय्यालाल सुगंधी हे कुटुंबासह हैदराबाद-हिस्सार एक्सप्रेसने बऱ्हाणपुर (मध्यप्रदेश) साठी प्रवास करत होते. प्रवासात ते झोपलेले असतांना नगरसुल ते मनमाड रेल्वे स्थानकादरम्यान त्यांची सुटकेस चोरीला गेली. त्यामध्ये रोख ७ हजार रूपये, सोन्या-चांदीचे दागिने, कपडे असा २३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल होता. त्यांनी जळगांव लोहमार्ग पोलिस स्थानकांत या घटनेची फिर्याद दिल्यानंतर तेथील लोहमार्ग पोलिस आणि रेसुब कर्मचारी यांनी तपास सुरू केला.
हैदराबाद एक्सप्रेसमध्ये चोरी केल्यानंतर या संशयित चार महिला मनमाड रेल्वे स्थानकांत उतरल्या. येथून त्या दादर अमृतसर एक्सप्रेसने प्रवास करत होत्या. पोलिस आणि सुरक्षारक्षक त्यांच्या मार्गावर होते.याच दरम्यान सुरक्षा बलाच्या पथकाने धावत्या गाडीत या महिलांना बरोबर हेरले. कारण त्या मनमाड रेल्वे स्थानकांत सीसीटीव्हीत कैद झालेल्या होत्या. त्यामुळे त्यांनी रेल्वे बदलली तरी त्यांना पकडण्यात यश आले.
१ ) पायल जीवन काळे, (वय-१९ )रा.इंदिरानगर, गुलवाडी जि.अहिल्यानगर, २ ) गौरी महाजन काळे (वय १९), रा.वालवड, जि. उस्मानाबाद, ३ ) रेशमा किशोर भोसले (वय २०) रा. कहेटाकळी, जि.अहिल्यानगर, पूजा जीवन काळे ( २०), रा.इंदिरानगर जि. अहिल्यानगर अशी त्यांची नावे असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्याकडून पोलिसांनी चोरीस गेलेली सुटकेस ताब्यात घेतली. लोहमार्ग पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर केले असता पायल जीवन काळे, (वय-१९ )रा.इंदिरानगर, गुलवाडी जि.अहिल्यानगर या महिलेस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली तर इतर तीन महिलांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे.
दरम्यान या चोरीच्या घटनेमध्ये १४ हजार ६०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले असून पुढील तपास लोहमार्ग निरीक्षक महेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी संतोष शिंदे हे तपास करीत आहेत.