नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- घरावर दगडफेक करून पाच लाख रुपयांची मागणी करणार्या टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पंकज चंद्रकांत रकिबे (रा. पंचवटी, ता. जि. नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की ते सतनाम राजपूत यांच्या घरी पाळीव कुत्र्याला जेवण देण्यासाठी गेले होते. त्यावेळी संशयित हर्षद सुनील पाटणकर (वय 25, रा. बेथेलनगर, शरणपूर रोड), सुमित बगाटे व इतर 10 ते 11 साथीदार हे जोरजोरात आरडाओरडा करीत सतनाम राजपूत यांच्या घरावर दगडफेक करीत होते.
त्यावेळी फिर्यादी हे त्यांच्यावर ओरडले असता ते सर्व जण रकिबे यांच्याकडे आले व त्यांना दमबाजी व अरेरावी केली, तसेच हर्षद पाटणकर हा म्हणाला, की सतनाम राजपूतकडे खूप पैसा जमा झाला आहे. त्याला सहीसलामत राहायचे असेल, तर पाच लाख रुपये द्यायला सांग. त्यावर फिर्यादी यांनी टोळक्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याचा राग आल्याने हर्षद याने रकिबे यांच्या गळ्यातील एक तोळा वजनाची सोन्याची चेन व सुनील बगाटे याने फिर्यादीच्या खिशातील तेराशे रुपये बळजबरीने हिसकावून घेतले. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बोंडे करीत आहेत.