पंतप्रधान मोदींचा अपमान मालदीवला महागात! EaseMyTrip चा मोठा निर्णय, विमानसेवांचे बुकिंग रद्द
पंतप्रधान मोदींचा अपमान मालदीवला महागात! EaseMyTrip चा मोठा निर्णय, विमानसेवांचे बुकिंग रद्द
img
Dipali Ghadwaje
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यावर अवमानजनक टिप्पणी करणं मालदिवच्या मंत्र्यांना चांगलंच महागात पडल्याचं दिसून आलं.  मालदीवच्या युवा मंत्रालयात, उपमंत्री मरियम शिउना, मलशा शरीफ आणि अब्दुल्ला महजूम मजीद यांनी पीएम मोदींबद्दल अशोभनीय टिप्पणी केली. त्यामुळे अनेक मोठ्या व्यक्तींसह भारतीयांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला. सोशल मीडियावर मालदीववर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करण्यात आले.

भारतातील अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लोकांना मालदीवला जाण्याऐवजी देशांतर्गत पर्यटन स्थळांना भेट देण्याचे आवाहन केले. अनेक भारतीय मालदीवचा दौरा रद्द करत असल्याचा दावाही सोशल मीडियावर करण्यात आला होता.

भारतासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल मालदीवच्या मंत्र्यांनी आक्षेपार्ह शब्दांत टिप्पणी केल्याचे पडसाद उमटू लागले आहेत. भारतीयांनी ‘बायकॉट मालदीव’हा ट्रेंड सुरू केला असून त्यात सेलिब्रिटींनीही उडी घेतली. यानंतर आता EaseMyTrip या ट्रॅव्हल कंपनीने या घटनेचा निषेध व्यक्त केला असून, मालदीवला जाणाऱ्या विमानांचे बुकिंग रद्द केले आहे. कंपनीचे सीईओ निशांत पिट्टी यांनी एक्सवर यासंदर्भातील घोषणा केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, EaseMyTrip या कंपनीचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी निशांत पिट्टी यांनी मालदीवच्या मंत्र्यांनी भारत आणि पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या अपमानास्पद टिप्पण्यांनंतर मालदीवसाठी सर्व फ्लाइट बुकिंग रद्द करण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाला समर्थन म्हणून EaseMyTrip ने मालदीवच्या सर्व विमानसेवांचे बुकिंग रद्द केले आहे, असे निशांत पिट्टी यांनी सांगितले आहे.

EaseMyTrip ने सुरू करणार ‘चलो लक्षद्वीप’ अभियान मालदीवला जाणाऱ्या विमानांचे बुकिंग रद्द केल्यानंतर आता EaseMyTrip कंपनीने ‘चलो लक्षद्वीप’ अभियान सुरू करणार आहे. लक्षद्वीप येथील समुद्र किनारे मालदीवसारखेच सुंदर आहेत. EaseMyTrip प्राचीन स्थळांचे पर्यटन वाढण्यावर भर देईल. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच लक्षद्वीप दौरा केला आहे. लक्षद्वीपला जाण्यासाठी कंपनीकडून विशेष ऑफर असलेले टूर पॅकेज लवकरच आणले जाईल, असेही निशांत पिट्टी यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर मालदीवच्या तीन मंत्र्यांनी भारतासह पंतप्रधान मोदींविरोधात टिप्पणी केली. त्यानंतर मालदीव सरकारने सारवासारव करत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मरियम शिउना, जाहीद रमीझ आणि महजूम माजिद यांना निलंबित केले.  
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group