गेल्या आठवड्यापासून देशभरात अनेक भीषण आगीच्या घटना घडल्या आहेत.आधी दिल्लीत एका हॉटेलला भीषण लफळी होती त्यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले होते. या घटनेपाठोपाठच बिहारमध्ये एका हॉस्पिटलला देखील भीषण आग लागली होती.या आगीत देखील मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली होती. दरम्यान आता आणखी एका भीषण आगीची एक बातमी सामोर येत आहे.
जळगाव जिल्ह्यातील एमआयडीसी परिसरात असलेल्या एका कुलर निर्मिती कंपनीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. एमआयडीसीतील जय इंडस्ट्रीज या कंपनीत अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. आगीची तीव्रता इतकी होती की, कंपनी परिसरातून मोठ्या प्रमाणात धुराचे लोट आकाशात पसरले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, आग लागल्यानंतर तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, कंपनी परिसरात ठेवण्यात आलेले गॅस सिलेंडर वेळेत बाहेर काढण्यात आल्याने मोठा स्फोट होण्याचा धोका टळला. सिलेंडर सुरक्षितस्थळी हलवण्यात आल्यामुळे आग आणखी भडकण्यापासून रोखण्यात यश आले.
या आगीत कंपनीचे नेमके किती नुकसान झाले याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. तसेच आग लागण्याचे कारणही स्पष्ट झाले नसून, संबंधित यंत्रणांकडून याबाबत तपास सुरू करण्यात आला आहे.
घटनेमुळे एमआयडीसी परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे परिस्थिती नियंत्रणात आली असून, पुढील चौकशी सुरू आहे.