"मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य, यंत्रणा कामाला लागली, त्यांनी मान ठेवावा" - दीपक केसरकर
img
Dipali Ghadwaje
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारच्या शिष्टमंडळासोबत केलेल्या चर्चेनंतर थोड्याच वेळात या चर्चेचा तपशील स्वत: जरांगे पाटील हे समाजासमोर ठेवणार आहेत. तसंच यावेळी मनोज जरांगे पाटील हे आंदोलन मागे घेण्याची घोषणाही करू शकतात. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. 

"मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत. शासकीय नियमांनुसार त्यावर अंमलबजावणी होईल. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा आपण ३७ लाख कुणबी प्रमाणपत्र दिले. आता आणखी देऊन ही संख्या ५० लाखांच्या वर जाणार आहे," असा दावा दीपक केसरकरांनी केला आहे.

दरम्यान मराठा आंदोलनाबाबत बोलताना दीपक केसरकर पुढे म्हणाले की, "मुंबई ठप्प होणं हे देशाच्या दृष्टीने योग्य नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः पुढाकार घेत यंत्रणा कामाला लावली आहे. शेवटी प्रथा परंपरेचा मान ठेवणे ही सुद्धा राज्याची संस्कृती राहिली आहे

किती अधिकारी भेटायला गेले, किती नेते भेटायला गेले आणि आता सर्व यंत्रणा कामाला लागल्या आहेत. मनोज जरांगेनी मान ठेवला पाहिजे, त्यांनी आंदोलन मागे घेतल्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री भेटून आनंद नक्कीच साजरा करतील," अशी भूमिका केसरकर यांनी घेतली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group