नवीन नाशिक (प्रतिनिधी) :- खंडणी मागून घरातील कुटुंबाला दमबाजी करणार्या तरुणाविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी गणेश हिरालाल ठाकरे (रा. खुटवडनगर, नाशिक) हे बाफणा ज्वेलर्स येथे सुरक्षा रक्षक म्हणून काम परतात. त्यांचा मोठा भाऊ व आरोपी सनी उर्फ मॉन्टी दळवी यांनी उत्तमनगर बसस्टॉपजवळ भागीदारीत वडापाव विक्रीचा स्टॉल सुरू केला होता. त्यावेळी फिर्यादी ठाकरे यांच्या भावाने दळवीकडून 70 हजार रुपये घेतले होते. परंतु व्यवसायामध्ये त्यांना नुकसान झाले.
म्हणून त्यांची वडापाव विक्रीचा व्यवसाय बंद केला. त्यानंतर फिर्यादीच्या भावाने आरोपी मॉन्टी दळवी याला 70 हजार रुपये परत देऊनही तो अधिकचे पैसे मागत आहे. हे पैसे घेण्यासाठी दळवी हा गेल्या दीड वर्षापासून फिर्यादी यांच्या घरी आरोपी मॉन्टी दळवी व त्याची आई येऊन सारखे पैशांची मागणी करतात.
त्याचप्रमाणे काल रात्री साडेनऊच्या सुमारास मॉन्टी दळवी व त्याची आई फिर्यादी यांच्या घरी आले आणि 24 हजार रुपये आजच्या आज पाहिजे, अशी मागणी करुन फिर्यादी ठाकरे यांच्या वडिलांची गच्ची पकडून शर्ट फाडला. तसेच मोठमोठ्याने ओरडून परिसरात गोंधळ निर्माण केला. तसेच तुम्हीला भविष्यात धंदा करायचा असेल तर मला पैसे द्यावे लागतील, अशी धमकी देऊन खंडणीची मागणी करुन आरोपी मॉन्टी दळवी हा दमबाजी करुन निघून गेला.
याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहे.