नाशिकरोड (प्रतिनिधी) :- एकलहरा रोड येथे पाणीपुरी विक्रेत्याच्या पत्नीच्या हत्येची उकल करण्यात नाशिकरोड पोलिसांना यश आले आहे. मयताचा लहान मुलगा या घटनेचा साक्षीदार असल्याने काही तासांत या खुनाचा उलगडा करण्यात आला.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी, की क्रांती बनेरिया या महिलेचे तिचा भाचा अभिषेकसमवेत अनैतिक संबंध होते. काल दुपारी दोघांमध्ये किरकोळ वाद झाले. या वादाचे रूपांतर नंतर धक्काबुक्कीत झाले. राग अनावर झाल्याने अभिषेकने त्याच्याजवळ असलेल्या चाकूने मामीवर वार करून तिला ठार मारले व स्वत:ही गळ्यावर चाकू मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करीत दोघांवर हल्ला झाल्याचा बनाव केला; मात्र या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिसांना भाच्यानेच हे कृत्य केल्याचा संशय बळावला होता.
पाणीपुरी विक्रेता सुदाम रामसिंग बनेरिया (वय 35, रा. सामनगाव, एकलहरा रोड, नाशिकरोड) हा पत्नी व भाच्यासमवेत एकलहरा येथे राहतो. काल दुपारी त्याच्या पत्नीवर अज्ञात इसमांनी घरात प्रवेश करून प्राणघातक हल्ला करून तिचा खून केल्याची घटना घडली होती. सुदाम बनेरियाने नाशिकरोड पोलीस ठाण्यात पत्नीची हत्या व भाच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध फिर्याद दिली होती.
हा प्रकार संशयास्पद वाटत असल्याने त्यादृष्टीने नाशिकरोड पोलिसांनी तपास सुरू केला.
महिलेची हत्या प्रेम प्रकरण, अनैतिक संबंधातून की अन्य कारणातून झाली, याबाबत तर्कवितर्क लावले जात होते. दरम्यान, पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे व दोघांच्या फोन रेकॉर्डवरून माहिती मिळवीत ही हत्या भाच्यानेच केल्याचे निष्पन्न झाले; मात्र अभिषेकच्या गळ्यावर गंभीर जखम असल्याने तो बोलण्याच्या मन:स्थितीत नाही. पोलिसांच्या तपासात भाच्याने केलेला बनाव उघड झाला असून, या खुनाचे गूढ उकलण्यात यश आले आहे.
हत्येची घटना घडल्यानंतर घटनास्थळी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर. आर. शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक काळे आदींनी भेट दिली. या प्रकरणाचा उलगडा करीत असताना आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त मोनिका राऊत व सहाय्यक आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेळके व नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या अधिकारी कर्मचार्यांनी काही तासांत याची उकल केली. मुलांनी दिलेल्या जबाबावरून भाच्यानेच ही हत्या केल्याचे उघड झाले आणि पोलिसांचा संशय खरा ठरला.