५ ऑक्टोबर २०२४
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- मिळकत यापूर्वी इतरांना विक्री करीत पुन्हा एका ग्राहकाला विक्री करून त्याची साडेदहा लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बिल्डर दाम्पत्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत फिर्यादी दिलीप हरसिंग राठोड (रा. मु. पो. ता. पारोळा, जि. जळगाव) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की आरोपी शोभा रमेश साळवे व रमेश रावजी साळवे (रा. मु. पो. ता. जि. नाशिक) यांचा निर्मिती बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स या नावाने व्यवसाय आहे. आरोपी रमेश साळवे याची फिर्यादी राठोड यांच्याबरोबर बरोबर काही वर्षांपूर्वी ओळख झाली होती.
साळवे याने शिंदे गावात स्वत:च्या मालकीचे काही प्लॉट्स असल्याचे राठोड यांना सांगितले, तसेच शोभा साळवे व रमेश साळवे यांनी राठोड यांना या प्लॉटपैकी 400.00 चौ. मी. प्लॉट घेण्याची गळ घातली. त्यानंतर रमेश साळवे याने मौजे शिंदे येथील गट नंबर 797 या जमिनीपैकी 400.00 चौरस मीटर क्षेत्राचे खरेदी खत फिर्यादी राठोड यांच्या लाभात दि. 12 जानेवारी 2018 रोजी सहदुय्यम निबंधक नाशिक-2 यांच्या कार्यालयात खरेदी खत दस्त लिहून व नोंदवून दिलेले आहे.
हा सर्व खरेदी खताचा व्यवहार करताना बिल्डर दाम्पत्याने ही मिळकत यापूर्वीच इतर व्यक्तींना विक्री केल्याचे लपवून ठेवत ही मिळकत राठोड यांना विक्री करून त्यांची 10 लाख 38 हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार दि. 19 मार्च 2023 ते दि. 5 एप्रिल 2021 या कालावधीत नाशिकरोड येथील सहदुय्यम निबंधक कार्यालयात घडला.
फसवणुकीची बाब लक्षात आल्यानंतर फिर्यादी दिलीप राठोड यांनी आरोपी दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याबाबत न्यायालयात तक्रार अर्ज दिला होता. त्या अर्जावर कार्यवाही करीत न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार नाशिकरोड पोलीस ठाण्यात बिल्डर दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बिडकर करीत आहेत.
Copyright ©2024 Bhramar