नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- शेतीच्या वादातील राग मनात धरून एका इसमाच्या डोक्यात पहार मारून त्याचा खून केल्याप्रकरणी एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी विजय सुरपाल अखाडे व त्याचे वडील सुरपाल अखाडे (दोघेही रा. बेछडा, ता. जि. खरगोन, मध्य प्रदेश) हे दि. ७ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी आठ वाजता लहवित येथे रेल्वे पोलजवळ रेल्वेचे स्लीपर बदलण्याचे काम करीत होते. दुपारी १ वाजेच्या सुमारास काम आटोपून घरी जाण्याची तयारी करीत असताना फिर्यादी विजय अखाडे व करण नामक व्यक्ती पाणी पीत होते.
त्यावेळी आरोपी गुलाबसिंग अखाडे (वय ४५, रा. बेछडा, ता. जि. खरगोन) याने शेतीच्या वादाचा राग मनात धरून फिर्यादीचे वडील सुरपाल अखाडे यांच्या डोक्यात लोखंडी पहारीने मारहाण करण्यास सुरुवात केल्याने ते खाली पडले. फिर्यादी हा वाद सोडविण्यास गेले असता आरोपी हा त्यांच्यामागे लोखंडी पहार घेऊन धावू लागला.
त्यानंतर आरोपी गुलाबसिंग हा तेथून पळून गेला. जखमी अवस्थेत पडलेले वडील यांना फिर्यादीने औषधोपचारासाठी प्रथम कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी इंदूर येथे नेले होते. उपचारादरम्यान दि. १३ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी डॉक्टरांनी सुरपाल अखाडे यांना तपासून मयत घोषित केले. त्याबाबतची चौकशी खरगोन जिल्ह्यातील भिकनगाव पोलीस ठाण्यात सुरू होती.
या प्रकरणी शेतीच्या वादातून आरोपी गुलाबसिंग अखाडे याने सुरपाल अखाडे यांच्या डोक्यात लोखंडी पहार मारून त्यांचा खून केल्याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देवरे करीत आहेत.