नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- प्रसिद्ध एशियन पेंट्सच्या नावाने बनावट रंगाचे डबे विक्री करण्याच्या उद्देशाने स्वत:च्या कबजात बाळगणाऱ्या एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी सुभाष हरिश्चंद्र जैस्वाल (रा. अहमदाबाद, गुजरात) हे प्रसिद्ध एशियन पेंट्स कंपनीच्या दिल्ली येथील कार्यालयाचे कामकाज पाहतात. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की आरोपी संतोष लक्ष्मण दाभाडे (रा. त्रिमूर्तीनगर, नवीन आडगाव नाका, पंचवटी) याने नारायण बापू चौकात असलेल्या बालाजी एंटरप्रायजेस नावाच्या दुकानात व गोडाऊनमध्ये 20 हजार 400 रुपये किमतीचे बनावट एशियन पेंट्सचे 20 लिटरचे सहा बनावट रंगाचे भरलेले बकेट, 7 हजार 600 रुपये किमतीचे ट्रॅक्टर युनोचे 8 बकेट, 48 हजार रुपये किमतीचे रॉयल लक्झरी इम्युलसनचे 20 लिटरचे चार बकेट, 38 हजार 500 रुपये किमतीचे स्मार्ट केअर डॅम्प प्रूफचे 20 लिटरचे सात बकेट व 16 हजार रुपये किमतीचे ॲपेक्स डस्ट प्रूफ दहा लिटरचे 5 रंगांनी भरलेले बकेट असा एकूण 11 लाख 30 हजार 500 रुपये किमतीचा एशियन पेंट्स कंपनीच्या नावाने बनावट रंगाचे डबे तयार करून ते विक्री करण्याच्या उद्देशाने स्वत:च्या कबजात बाळगताना मिळून आला.
या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात आरोपी संतोष दाभाडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष सोनवणे करीत आहेत.