५ ऑक्टोबर २०२४
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- परिसरात दहशत निर्माण करणार्या गुन्हेगारास पकडत असताना त्याने पोलीस उपनिरीक्षकाच्या पोटात चाकू मारून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार पंचवटीत घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की मध्यवर्ती गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव सोनवणे (रा. धात्रक फाटा, आडगाव) असे चाकूचा वार झालेल्या अधिकार्याचे नाव आहे. दिंडोरी रोडवरील गीता हार्डवेअरजवळ रेकॉर्डवरील गुन्हेगार विकी संजय जाधव ऊर्फ गट्ट्या (रा. अवधूतवाडी) हा काल (दि. 4) रात्री 8 वाजेच्या सुमारास हातातील चाकू फिरवून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करीत होता. त्यावेळी फिर्यादी सोनवणे हे त्याला पकडत असताना त्याने त्याच्या हातातील चाकू सोनवणे यांच्या पोटात खुपसून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात विकी जाधव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पडोळकर करीत आहेत.
Copyright ©2024 Bhramar