नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- मुलीच्या लग्नासाठी दागिने बनविण्यासाठी प्रसिद्ध सराफाकडे दिले असता त्याने ते दागिने तयार करून न देता निवृत्त पोलीस अधिकार्याची 15 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी चंद्रसेन नारायणराव देशमुख (रा. आनंदवल्ली, नाशिक) हे सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक आहेत. देशमुख यांनी सराफ बाजारातील अभिनंदन ज्वेलर्सचे कांतीलाल सुगनचंद सराफ या पेढीचे संचालक सतीश कांतीलाल बेदमुथा यांना मुलीच्या लग्नाचे दागिने तयार करण्यासाठी विश्वासाने 211.16 ग्रॅम 24 कॅरेटचे शुद्ध सोने दिले होते.
ऑर्डरप्रमाणे दागिने न देता किंवा ते सोने देशमुख यांना परत न करता त्यापैकी फक्त 83.89 ग्रॅम वजनाचे 22 कॅरेट सोने दागिन्यांसाठी खर्च झालेले असताना उर्वरित 127.27 ग्रॅम 24 कॅरेट शुद्ध सोने आजच्या दरानुसार 9 लाख 88 हजार 251 रुपये व दुरुस्तीसाठी दिलेले 22 कॅरेट सोन्याचे 38 ग्रॅम दागिने पुष्कराज खड्यासह आजच्या दरानुसार 2 लाख 74 हजार 370 रुपयांचे सोने बळकावले. फिर्यादी देशमुख यांना दिलेल्या 24 कॅरेट 83.89 ग्रॅम सोन्याचा दरानुसार येत असलेला किमतीतील फरक 2 लाख 51 हजार 670 न देता उलट 93.320 ग्रॅम वजनाच्या खोट्या सोन्याच्या सहा बांगड्या देऊन विश्वासघात करून एकूण 15 लाख 14 हजार 291 रुपयांची फसवणूक केली.
सतीश बेदमुथा यांच्याविरुद्ध विश्वासघात व फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊन फिर्यादीचे झालेले आर्थिक नुकसान भरून मिळण्याची मागणी केली आहे. आरोपी बेदमुथा यांनी वेळोवेळी निरनिराळे बहाणे सांगून उर्वरित दागिने व सोने परत करतो, असे आश्वासित केले; मात्र ते परत दिले नाहीत. हा प्रकार दि. 21 जून ते 2 जुलै 2023 या कालावधीत घडला होता.
या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरवाडे करीत आहेत.