नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने लिंक पाठवून त्याद्वारे माहिती मिळवून अज्ञात भामट्याने तरुणाच्या बँक खात्यातून परस्पर दीड लाख रुपये ट्रान्झॅक्शन करून फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी ऋषिकेश भूषण पलोड (वय 29, रा. अनमोल नयनतारा, तिडके कॉलनी) हे दि. 10 जुलै रोजी वडाळा नाका येथे होते. त्यावेळी 7384509316 या क्रमांकावरून अज्ञात इसमाने केवायसी अपडेट करण्यासाठी फोन केला, तसेच पलोड यांना लिंक पाठविली. ही लिंक ओपन करून त्यात माहिती भरली. त्यानंतर काही वेळात पलोड यांच्या स्टेट बँकेच्या महात्मानगर शाखेतील करंट अकाऊंटमधून 49 हजार 999 रुपयांचे तीन ट्रान्झॅक्शन करून एकूण 1 लाख 49 हजार 997 रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली.
या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध ऑनलाईन फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.