नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- मुंबई सायबर क्राईम ब्रँचमधून पोलीस अधिकारी बोलत असल्याचे भासवून अटक टाळण्यासाठी एका जणाकडून सुमारे साडेतीन लाखांची ऑनलाईन खंडणी उकळून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की अज्ञात आरोपींनी संगनमत करून फिर्यादी यांना व्हॉट्सअॅप क्रमांकावरून संपर्क साधून कुरिअर कंपनी व मुंबई सायबर क्राईम ब्रँचमधून पोलीस अधिकारी बोलत असल्याचे भासविले. आरोपींनी फिर्यादीच्या आधार कार्डाचा वापर करून कुरिअर सर्व्हिसद्वारे पार्सल पाठविले. त्या पार्सलमध्ये दोनशे ग्रॅम ड्रग्ज, पाच पासपोर्ट, तीन बँकांची एटीएम व इतर वस्तू असल्याचे सांगितले. त्याद्वारे मनी लॉण्डरिंगचे व्यवहार झाले असून, फिर्यादीविरुद्ध अटकवॉरंट काढल्याचे सांगितले. त्याबाबत व्हॉट्सअॅपवर सीबीआय व मुंबई पोलिसांची लोगो असलेली नोटीस पाठवून चौकशी सुरू असल्याचे सांगितले. ही माहिती गोपनीय ठेवून घरातील कुटुंबीय कार्यालयातील स्टॉक व स्थानिक पोलिसांना सांगू नये, अशी ताकीद फिर्यादीला दिली.
जोपर्यंत तुम्ही पैसे भरत नाहीत, तोपर्यंत तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना धोका आहे, असे सांगून तोतया पोलीस अधिकार्याने विविध यूपीआयडीवर 3 लाख 36 हजार 793 रुपये भरण्यास भाग पाडून त्यांच्याकडून खंडणी उकळली. आपली फसवणूक झाल्याची बाब लक्षात आल्यानंतर फिर्यादीने सायबर पोलीस ठाण्यात सायबर भामट्याविरुद्ध फिर्याद दिली असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक ढवळे करीत आहेत.