सव्वा लाखाचे साडेआठ लाख रुपये व्याजाने फेडूनही मागितली आठ लाखांची खंडणी
सव्वा लाखाचे साडेआठ लाख रुपये व्याजाने फेडूनही मागितली आठ लाखांची खंडणी
img
दैनिक भ्रमर

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- हातउसनवार घेतलेल्या पैशाची दहा टक्के व्याजाने परतफेड केल्यानंतरही थकबाकी असल्याचे कारण सांगून आठ लाख रुपयांची खंडणी मागणार्‍या एकाच कुटुंबातील चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी दशरथ पंडित साबळे (वय 44, रा. सुबोधशिल्प अपार्टमेंट, रामनगर, गंगापूर रोड, नाशिक) हे हॉटेलचे वेटर म्हणून काम पाहतात. साबळे यांनी दि. 5 मार्च 2016 रोजी आरोपी सुनील महाजन यांच्याकडून 1 लाख 30 हजार रुपये दहा टक्के व्याजाने हातउसनवार घेतले होते. त्या रकमेपोटी दि. 5 मार्च 2016 पासून 24 सप्टेंबर 2024 या कालावधीत फिर्यादी साबळे यांच्याकडून दहा टक्के व्याजासह 8 लाख 45 हजार रुपये रोख व ऑनलाईन स्वरूपात आरोपी महाजन याने वसूल केले आहेत; मात्र महाजन याने या रकमेपोटी आठ लाख रुपये बाकी असल्याचे सांगितले.

या आठ लाख रुपयांच्या वसुलीसाठी आरोपी सुनील महाजन, ज्योत्स्ना महाजन, दीपक महाजन व महाजन यांचे चुलतसासरे (नाव, गाव व पत्ता माहीत नाही) यांनी संगनमत करून साबळे यांच्या वारंवार येऊन तगादा लावला, तसेच हे आठ लाख रुपये न दिल्यास जेलमध्ये टाकण्याची धमकी देत फिर्यादीच्या बायकोला सांभाळीन, असे सांगून साबळे यांच्या दोन्ही मुलींना जिवे ठार मारण्याची धमकी वरील चारही आरोपी देत आहेत, त्याचप्रमाणे खंडणीच्या वसुलीसाठी अंबड पोलीस ठाण्यातून बोलत असल्याचे सांगून फोन करून चौकशीकरिता पोलीस ठाण्यात या, असा फोन वारंवार करून साबळे यांना त्रास देत आहेत.

वारंवार होणार्‍या या त्रासाला कंटाळून फिर्यादी दशरथ साबळे यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात आरोपी सुनील महाजन, ज्योत्स्ना महाजन, दीपक महाजन व त्यांच्या सासर्‍याविरुद्ध खंडणीची फिर्याद दिली असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.


इतर बातम्या
Join Whatsapp Group