२० सप्टेंबर २०२४
नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी) :- सहकार उपनिबंधक कार्यालयाच्या पथकाने अवैधरीत्या सावकारी करणार्या महिलेच्या घरावर धाड टाकून धनादेश व संशयास्पद दस्तावेज हस्तगत करून तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सहकार निबंधक कार्यालयाचे अधिकारी शैलेश अरविंद पोतदार (रा. उदयनगर, मखमलाबाद रोड, पंचवटी) यांनी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोतदार हे उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयातील अधिकारी आहेत.
या कार्यालयात अर्जदार महिला निशा सुधीर जगताप यांनी अवैध सावकारी करणार्या साधना खान (रा. नाडकर्णी बंगलो, देवळाली कॅम्प, नाशिक) हिच्याविरुद्ध उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयात तक्रार अर्ज दाखल केला होता.
त्या तक्रार अर्जाची दखल घेत उपनिबंधक सहकारी संस्थेच्या कार्यालयातील पथकाने आरोपी अवैध सावकार साधना खान हिच्या देवळाली कॅम्प येथील घरावर छापा टाकून घरझडती केली.
त्यावेळी या पथकाला साधना खान हिच्या घरात अनेक जणांच्या सह्या केलेले 22 चेक, 7 नोटरी, खरेदीखत, साठेखत व 2 हिशेबाच्या नोंदी असलेल्या डायर्या मिळून आल्या. या छाप्यातून ही महिला अवैधरीत्या सावकारी व्यवसाय करीत असल्याचे निष्पन्न झाल्याचे समोर आले.
या प्रकरणी खरेदी शैलेश पोतदार यांनी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी साधना खान हिच्याविरुद्ध अवैध सावकारी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अहिरे करीत आहेत.
Copyright ©2024 Bhramar