नवीन नाशिक (प्रशांत निरंतर) :- पैशांची मागणी करून ब्लॅकमेल करणार्या दोन तरुणी व एका तरुणाच्या जाचाला कंटाळून एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सिडकोत घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की याबाबत रोशन बाळासाहेब कुयटे (वय २२, रा. कार्तिकेयनगर, खुटवडनगर, नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की काल (दि. १) सकाळी कुयटे हे घरी असताना त्यांचा भाऊ ललित बाळासाहेब कुयटे (वय ३३) हा सकाळी त्याच्या रूममधून बाहेर आला नाही म्हणून त्यांनी गॅलरीत जाऊन त्याच्या रूमची खिडकी उघडून पाहिली असता ललित हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. त्याने ही माहिती अंबड पोलिसांना कळविली.
पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह खाली उतरवला. त्यावेळी शवविच्छेदनासाठी त्याचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात नेला असता त्याच्या पँटच्या खिशात एक चिठ्ठी मिळून आली. मयत ललित कुयटे याला त्याची मैत्रीण आरोपी जिज्ञासा पाटील नवरे, तिचा मित्र ओम्कार शिंदे व मोना (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) यांनी त्याच्याकडे वारंवार पैशांची मागणी केली, तसेच मोना नावाच्या तरुणीकडे मयत ललितचे रेकॉर्डिंग असल्याने तीही ब्लॅकमेल करून वारंवार पैसे मागत असे.
तसेच मैत्रीण जिज्ञासा पाटील-नवरे व तिचा मित्र ओम्कार शिंदे याला ललितने ४० हजार रुपये रोख स्वरूपात दिले होते. त्याचप्रमाणे दोन्ही आरोपींना गाडी लागत असल्याने त्यांनी त्याबाबत प्रथम ७० हजार रुपये व नंतर एक लाख रुपये रोख स्वरूपात दिले. तरी ते त्याबाबत वारंवार पैशाची मागणी करीत असल्याचे मयत ललित याने सुसाईड नोटमध्ये नमूद केले असून, या त्रासाला कंटाळूनच आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे.
या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात आरोपी जिज्ञासा पाटील नवरे व तिचा मित्र ओम्कार शिंदे व मोना यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.