नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- भरदीपावली सणाच्या काळात भाऊबीजेच्या दिवशीच सख्ख्या भावाने वयोवृद्ध बहीण व मेहुण्याची जमिनीच्या वादातून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आरोपी सोमनाथ बेंडकुळे यास पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत माहिती अशी, की साडगाव, गिरणारे शिवारात मयत रामू राघव पारधी (वय 70) व त्यांच्या पत्नी चंद्रभागा रामू पारधी (वय 65) यांचा अज्ञात आरोपीने टणक हत्याराने मारहाण करून ठार मारले होते. या प्रकरणी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध दि. 6 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने व वरिष्ठ अधिकार्यांनी या दुहेरी खुनाची तातडीने दखल घेऊन तालुका पोलीस ठाण्याच्या अधिकार्यांना योग्य त्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे व नाशिक तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यजित आमले यांनी घटनास्थळाची पाहणी करून मयताच्या नातेवाईकांकडे बारकाईने चौकशी केली, तसेच घटनास्थळी दोन दिवस पाळत ठेवून संशयित आरोपी सोमनाथ सावळीराम बेंडकोळी (रा. लाडची शिवार, ता. जि. नाशिक) यास ताब्यात घेतले.
त्याची अधिक चौकशी केली असता जमिनीच्या वादातून आपली बहीण चंद्रभागा व मेहुणे रामू पारधी यांना भाऊबीजेच्या दिवशी सायंकाळी लाकडी दांडक्याने अमानुष मारहाण करून जिवे ठार केले, अशी कबुली दिली. आरोपीस अटक करून याप्रकरणी पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे व सहकारी करीत आहेत. मयत पारधी दाम्पत्याला मूलबाळ नव्हते. ते मोलमजुरी करून प्रपंच चालवीत होते.
अवघ्या दोन दिवसांत गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर व उपविभागीय पोलीस अधिकारी हरिष खेडकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सानप, शिवाजी ठोंबरे, हवालदार संदीप नागपुरे, मेघराज जाधव, सचिन देसले, विनोद टिळे, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम व चालक पोलीस अंमलदार रवींद्र गवळी यांच्या पथकाचे अभिनंदन केले आहे.