Nashikroad Crime : सिगारेटचे पैसे मागितल्याच्या रागातून पानटपरीचालकास जिवे मारण्याचा प्रयत्न
Nashikroad Crime : सिगारेटचे पैसे मागितल्याच्या रागातून पानटपरीचालकास जिवे मारण्याचा प्रयत्न
img
Chandrakant Barve

नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी) :- सिगारेटचे पैसे मागितल्याचा राग आल्याने 7 ते 8 जणांच्या टोळक्याने पानटपरीचालकास धारदार शस्त्राने व लाकडी दांड्याने मारहाण करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी हर्षल राजेंद्र देवरे (रा. राधास्मृती सोसायटी, पाथर्डी रोड, इंदिरानगर) यांची नाशिक-पुणे रोडवरील घंट्या म्हसोबा महाराज मंदिरामागील रोडवर पानटपरी आहे. 

दि. 24 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास देवरे हे पानदुकानावर होते. पानदुकानाची आवरासावर झाल्यानंतर दुपारी तीन वाजेच्या सुमारास देवरे यांच्याशी परिचित असलेले जुने नाशिक येथे राहणारे लखन काशीद व क्रिश शिंदे हे त्यांच्या मोटारसायकलीवरून आले. मोटारसायकल उभी करून त्यातील लखन काशीद याने टपरीचालकाकडे गोल्ड फ्लॅक सिगारेट मागितली. ती दिल्यानंतर ते दोघे दुकानाजवळच सिगारेट पीत उभे राहिले.

तेव्हा त्यांच्याकडे सिगारेटचे पैसे मागितले असता दोघांनी पैसे देण्यास नकार दिला, तसेच “तू कसा काय आमच्याकडे पैसे मागतोस,” असे म्हणत “तू आम्हाला ओळखले नाही का? आम्ही जुन्या नाशिकचे भाई आहोत. आमच्याकडे कोणताच दुकानदार पैसे मागत नाही. तू कसा काय आमच्याकडे पैसे मागतोस?” असे म्हणत पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर दोघा आरोपींनी पानटपरीचालकास “तुझा काटा काढावाच लागेल,” असे म्हणत शिवीगाळ व धक्काबुक्की केली. तेव्हा त्यांना तेथून जाण्याबाबत सांगितले असता क्रिश शिंदे याने “थांब, तुझा गेमच करतो,” असे म्हणत आरडाओरडा करीत निघून गेला.

थोड्या वेळाने पुन्हा दोन-तीन मोटारसायकलीवर बसून सात ते आठ जण पानटपरीवर आले. त्यांनी मोठमोठ्याने आरडाओरडा करून टपरीचालकाला शिवीगाळ करीत परिसरात दहशत पसरवली. यावेळी टोळक्याच्या हातात हॉकीस्टिक, लाकडी दांडे व धारदार शस्त्रे होती. त्यापैकी लखन काशीद याने पानटपरीचालक देवरे याला पानटपरीबाहेर ओढले.

त्यानंतर जिवाच्या भीतीने देवरे पळाला; मात्र या टोळक्याने त्याला त्याच्या अंगावर गाडी घालून त्याला रोडवर पाडले. ते खाली पडले असता आरोपींनी हॉकीस्टिकने मारहाण केली. त्यानंतर सोबत असलेल्या इतर इसमांनी लाकडी दांडे व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तसेच जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने धारदार शस्त्राने शरीरावर मारहाण करून गंभीर वार केले. 

या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वायकर करीत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group