नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- नाशिक तालुक्यातील ग्रामीण भागातील पाणीटंचाई लक्षात घेता संबंधित प्रशासनाने दहा टक्के खुल्या जागेतील विहिरी आणि बोअरवेल ताब्यात घेऊन त्या पाण्याचा वापर ग्रामपंचायत क्षेत्रातील रहिवाशांना पाणीपुरवठा करण्यासाठी करावा, असा आदेश नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे सहमहानगर नियोजनकार दीपक वर्हाडे यांनी संबंधित ग्रामपंचायती व नाशिक पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना दिले आहेत.
प्राधिकरणाच्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे, की नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील विविध प्रयोजनांसाठीच्या अभिन्यास नकाशांना प्राधिकरणातर्फे मंजुरी देण्यात येते. यापैकी काही अभिन्यासांमध्ये एखादी विहीर किंवा बोअर असल्यास ती शक्यतो अभिन्यासात सक्तीने सोडावयाच्या दहा टक्के खुल्या जागेत दर्शविलेली असते. आपल्या ग्रामपंचायत क्षेत्रातील मंजूर अभिन्यासातील खुल्या जागेत अशा विहिरी किंवा बोअरवेल असल्यास त्यांची माहिती संकलित करून ग्रामपंचायतीने अशा विहिरी किंवा बोअरवेल ताब्यात घेऊन ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशांना पाणीपुरवठा करण्यासाठी त्यांचा वापर करावा, असे सूचनापत्रात म्हटले आहे.
नाशिकजवळील चांदशी व जलालपूर या ग्रामीण भागात पाणीटंचाई जाणवत असल्यामुळे चांदशीच्या ग्रामसेवकांनाही या आदेशाप्रमाणे विहीर व बोअर ताब्यात घेण्याचे सुचविण्यात आले आहे. तालुक्यातील अन्य ग्रामीण भागातही अशा प्रकारे लवकरच विहिरी व बोअरवेल ताब्यात घेतल्या जाण्याची शक्यता आहे.