३ सप्टेंबर २०२४
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून लोकांना धमकावून फसवणूक करणार्या इसमाने पत्नीला जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की आरोपी सागर हा सन २०१७ पासून दि. २ सप्टेंबर २०२४ पर्यंत त्याचे दैनंदिन कामकाज करीत असताना स्वत: पोलीस अधिकारी नसताना देखील पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करीत असे, तसेच पोलिसांचा गणवेश घालून इतरत्र फिरणे, सोशल मीडियावर पोलिसांच्या युनिफॉर्मवरील फोटो अपलोड करणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक या नावांच्या नेमप्लेट बनवून स्वत:चा पोलीस अधिकारी युनिफॉर्मवरील पासपोर्ट साईजचा फोटो काढून व त्याचा वापर सरकारी कार्यालये व सामान्य नागरिकांना पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करीत होता.
या गणवेशाचा वापर करून त्याचा स्वार्थ साधण्यासाठी व आर्थिक फायद्यासाठी लोकांना दमदाटी करून धमकावून फसविण्याचे गुन्हे करीत होता. याबाबतची खात्री झाल्यानंतर फिर्यादी पत्नीने त्याला असे करण्याबाबत विरोध केला. त्याने पत्नीला यांना वेळोवेळी धमकावणे, मारहाण करणे, तसेच जे मिळेल ते हत्यार घेऊन फिर्यादीला जिवे मारण्याची धमकी देत या प्रकरणी मारहाण केली. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात तोतया पोलीस अधिकार्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार टोपले करीत आहेत.
Copyright ©2024 Bhramar