मनमाडला 70 वर्षीय वृद्धाचा दगडाने ठेचून खून
मनमाडला 70 वर्षीय वृद्धाचा दगडाने ठेचून खून
img
दैनिक भ्रमर

नाशिक (प्रतिनिधी):-  मनमाड शहरातील बस स्थानकासमोर असलेल्या एका गॅरेज जवळ एका 70 वर्षीय वृद्धाचा डोक्यात दगड घालून खून झाल्याची घटना घडली असून मच्छिंद्र सदाशिव पवार असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. शहर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मनमाड शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाच्या समोर असलेल्या नगरपालिकेच्या व्यापारी संकुलातील एका गॅरेज समोर एक मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. स्थानिकांनी ही माहिती मनमाड शहर पोलीस ठाण्याला दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी रक्ताच्या थरोळ्यात पडलेला वृद्धाचा मृतदेह व रक्ताने माखलेला एक पेव्हर ब्लॉक मिळून आला.

घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केल्यानंतर हा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. मृत व्यक्तीची ओळख पटली असून मच्छिंद्र सदाशिव पवार (रा. संभाजीनगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मनमाड शहर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून मनमाड उपविभागीय पोलीस अधीक्षक बाजीराव महाजन व मनमाड शहर पोलीस निरीक्षक विजय करे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व कर्मचार्‍यांना सूचना केल्या.

या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कौशल वाघ हे करत आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group