२४ सप्टेंबर २०२४
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- दोन गटांतील वादाच्या कारणावरून शांतता भंग करून एकमेकांना धारदार हत्याराने वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस उपनिरीक्षक रमेश शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की काल (दि. 23) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास बडी दर्ग्याकडे जाणार्या रस्त्यावर मनपा शाळेजवळ हा प्रकार घडला. या ठिकाणी रेकॉर्डवरील गुन्हेगार मुन्ना कासार ऊर्फ उदैश कैलास कुंभकर्ण (वय 23, रा. नाव दरवाजा, जुने नाशिक) व त्याचे चार ते पाच अनोळखी साथीदार, तसेच राहुल वसंत नंदन (वय 32, रा. गंगावाडी, रविवार पेठ) व त्याचे साथीदार, तसेच जयू ऊर्फ जयेश सुरेश जाधव (वय 19, रा. तेली गल्ली, रविवार पेठ, सूरज भुजंगे (डोंगर), आकाश भुजंगे (डोंगर), श्रवण संजय गावित (वय 19, रा. पाटील गल्ली, बुधवार पेठ) व अवधूत जाधव (रा. सिडको) व त्याचे तीन ते चार साथीदार हे बडी दर्ग्याच्या रस्त्यावर आले. त्यावेळी या टोळक्यामध्ये दोन गटांतील वादाच्या कारणावरून हुज्जत झाली.
या गदारोळात सराईत गुन्हेगार मुन्ना कासार याने राहुल नंदन याच्या पोटात, तर राहुल नंदन याने मुन्ना कासार याच्या मानेवर धारदार हत्याराने वार करून एकमेकांना गंभीर दुखापत करून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने प्राणघातक हल्ला केला, तसेच सार्वजनिक ठिकाणी दगडफेक करून दहशत निर्माण करून शांततेचा भंग केला. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तीन जणांना अटक करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक देशमुख करीत आहेत.
Copyright ©2024 Bhramar