नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- रामवाडी परिसरात सुमारे दीड महिन्यापूर्वी बेवारस अवस्थेत मृतदेह मिळून आलेल्या इसमाच्या खुनाचा उलगडा झाला असून, या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट-1 च्या पथकाने कुप्रसिद्ध गुंड गटर्या ऊर्फ सुनील नागू गायकवाड याच्यासह त्याच्या दोघा साथीदारांना अटक केली आहे. गटर्याविरुद्ध नाशिक शहरातील विविध पोलीस ठाण्यांसह ग्रामीण भागातील पोलीस ठाण्यात तब्बल सुमारे 25 गुन्हे दाखल आहेत.

याबाबत माहिती अशी, की गेल्या दि. 31 ऑगस्ट रोजी रामवाडीजवळ कोशिरे मळ्यालगत एक बेवारस मृतदेह आढळून आला होता. पुढील तपासात त्याचे नाव पंढरीनाथ ऊर्फ पंड्या रघुनाथ गायकवाड असे असल्याचे निष्पन्न झाले.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी बेवारस संशयित मृतदेह आढळल्याप्रकरणी वेगाने तपास करावा, असे आदेश दिलेले असतानाच बुधवारी (दि. 9) गुन्हे शाखा युनिट-1 चे कर्मचारी विलास चारोस्कर व नितीन जगताप यांना गुप्त खबर्यामार्फत माहिती मिळाली, की सुनील गायकवाड ऊर्फ गटर्या व त्याचा चुलतभाऊ व एक साथीदार यांनी एक-दीड महिन्यापूर्वी एका इसमास बेदम मारहाण करून जिवे ठार मारले व त्याचा मृतदेह रिक्षातून आणून रामवाडी पुलाकडे जाणार्या रस्त्यावर कोशिरे मळ्यासमोर फेकून दिला.
ही माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, हवालदार रवींद्र आढाव, महेश साळुंके, शरद सोनवणे, पोलीस नाईक मिलिंदसिंग परदेशी, अंमलदार विलास चारोस्कर, नितीन जगताप, राहुल पालखेडे, आप्पा पानवळ, जगेश्वर बोरसे, समाधान पवार आदींच्या पथकाने सिद्धार्थनगर झोपडपट्टी, कॉलेज रोड येथे सापळा लावून सराईत गुन्हेगार सुनील नागू गायकवाड ऊर्फ गटर्या, विकास संतोष गायकवाड (दोघेही रा. सिद्धार्थनगर झोपडपट्टी, बॉईज टाऊन शाळेजवळ, कॉलेज रोड, नाशिक) यांना ताब्यात घेतले. त्यांची अधिक चौकशी करता सुनील ऊर्फ गटर्या गायकवाड याने शिवीगाळ करणार्या पंढरीनाथ ऊर्फ पंड्या गायकवाड यास त्यांच्या कौलारू घरात लाकडी दांड्याने मारहाण करून जिवे ठार मारले, तर गटर्याचे साथीदार विकास संतोष गायकवाड व साहिल शिंदे यांनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने पंढरीनाथ गायकवाड यांचा मृतदेह रिक्षातून आणून पंचवटीत कोशिरे मळ्यासमोर रामवाडी पुलाकडे जाणार्या रस्त्यावर टाकून दिला, अशी कबुली दिली. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात गटर्या व साहिल शिंदे यांच्याविरुद्ध भा. दं. वि. कलम 103 (1), 238, 3 (5) अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपासासाठी गटर्या व साहिल शिंदे यांना गंगापूर पोलिसांच्या हवाली केले.
गटर्याविरुद्ध 25 गुन्हे
कुप्रसिद्ध सराईत गुंड गटर्या याच्याविरुद्ध नाशिक शहर व ग्रामीण भागातील विविध पोलीस ठाण्यांत मारहाण, लुटालूट व इतर प्रकरणांत 25 गुन्हे दाखल आहेत. त्यात गंगापूर पोलीस ठाण्यात दहा, दिंडोरी पोलीस ठाण्यात चार, भद्रकाली पोलीस ठाण्यात दोन, सरकारवाडा पोलीस ठाण्यात दोन, पंचवटी पोलीस ठाण्यात चार, सिन्नर पोलीस ठाण्यात एक व अंबड पोलीस ठाण्यात एक अशा 25 गुन्ह्यांचा समावेश आहे.
कुप्रसिद्ध गुंडास अटक केल्याबद्दल पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके आणि अन्य वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गुन्हे शाखा युनिट-1 च्या पथकाचे अभिनंदन केले आहे.