४ सप्टेंबर २०२४
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- महिलेसोबतच्या अत्याचाराचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पीडितेवर पाच वर्षे लैंगिक अत्याचार करणार्या इसमाला पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत माहिती अशी, की पीडिता ही नाशिकरोड परिसरात राहते. आरोपी संजय हरिप्रसाद कनोजी (रा. जेलरोड, नाशिकरोड) याने पीडित महिलेशी ओळख निर्माण करून तिला घरी बोलावले. त्यानंतर तिच्या चहामध्ये कसले तरी गुंगीचे औषध टाकून तिच्यावर अत्याचार केले. त्याचा व्हिडिओ तयार करून तो पीडितेला वारंवार दाखवून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन वेळोवेळी त्याच्या राहत्या घरी, जेलरोड, हॉटेल यात्री, छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई, गोवा, पालघर, भावली डॅम, पहिने, त्र्यंबकेश्वर, तसेच वैतरणा डॅम अशा वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार करून त्याचा व्हिडिओ बनविला व हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन अत्याचार केले,
तसेच पीडितेच्या पतीच्या नावाचे बनावट आधारकार्ड तयार करून त्या आधारकार्डाचा हॉटेलमध्ये वापर केला, तसेच पीडितेला जातिवाचक उच्चार करून धमकी दिली. हा प्रकार ऑगस्ट 2019 ते ऑगस्ट 2024 या कालावधीत घडला.
याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात आरोपी संजय कनोजी याच्याविरुद्ध लैंगिक अत्याचारासह अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त बारी करीत आहेत.
Copyright ©2024 Bhramar